चालकांनी स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेत वाहतुकीचे नियम पाळावे – पी.जी.पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ :  उस वाहतुकीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. शेतातील उस वाहनातुन कारखानास्थळावर आणतांना चालकांनी स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेत रस्ते वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, अपघात टाळण्यासाठी नेहमी सतर्क रहावे, ज्या चालकांनी अजुनही वाहन परवाने काढले नाही त्यांनी ते तात्काळ काढुन घ्यावे. असे आवाहन श्रीरामपुर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.जी.पाटील यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपुर, कोपरगाव शहर व तालुका ग्रामिण पोलिस ठाणे, कोल्हे कारखाना त्याचप्रमाणे अमृत व सुवर्ण संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सहकार्याने मंगळवारी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यांत आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावरील साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार सर्व उसतोडणी कामगार, ट्रॅक्टर, ट्रक, जुगाड, उस वाहतुकदार मालक, चालक, सहाय्यकांची व्यक्तीगत सुरक्षेची काळजी घेवुन त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवितात, अपघातात देखील सातत्याने मदत करतात.

उस वाहतुकीसाठी आलेल्या सर्व वाहनांवर रिफक्लेटर, रेडीयमसह रात्रीच्या प्रकाशझोतात आवश्यक असणारे सर्व उपकरणे लावण्यांत आल्याचे सांगितले. उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी उसतोडणी कामगारांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे सुचनेवरून कारखान्यांने अपघात विमा योजना उत्तरविल्याचे सांगत सुरक्षा अभियानांतर्गत संपुर्ण हंगामात वेळीच घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. 

पी.जी.पाटील पुढे म्हणाले की, शासनस्तरावर उसतोडणी मजुर व वाहतुकदारांसाठी मोठ्या प्रमाणांत योजना आहेत. मात्र, बहुतांश उस वाहतुकदार चालकाकडे वाहन परवाना नसल्यांमुळे त्यांना मदत मिळवून देण्यांत अडचणी तयार होतात. कोपरगाव ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले म्हणाले की, ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेल्या उस वाहतुकीत चालक मोठया प्रमाणांत गाणी वाजवितात, क्षमतेपेक्षा जादा उसाची धोकेदायक वाहतुक करून स्वतःबरोबरच इतरांच्या अपघातास कारणीभूत होतात, ट्रॅक्टर जुगाडाद्वारे होणा-या उस वाहतुकीचा प्रश्न न्यायालयात अतिम टण्यात आहे. सर्व चालकांनी वेळीच सतर्कता बाळगावी असे सांगितले.

          श्रीरामपुर प्रादेशिक परिवहन उपअधिकारी रोहित पवार म्हणाले की, झाकलेले रिफक्लेक्टर, उसाची अधिक उंची, क्षमतेपेक्षा जादा माल, अधिक लांबी, गाणे बजावणे मोठा आवाज, नादुरूस्त वाहने, बैलगाडयांची रांग यामुळे रस्ते अपघात होण्यांचा जादा संभव असतो त्यासाठी वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे, मद्य प्राशन करून वाहन चालवु नये आदि सुचना त्यांनी केल्या. 

            याप्रसंगी कारखान्यांचे संचालक निलेश देवकर, रमेश घोडेराव, अमृत संजीवनीचे बापूसाहेब औताडे, कोपरगांव शहर पोलिस उपनिरीक्षक योगेश ठोंबरे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, उपसुरक्षा अधिकारी राजेंद्र देवकर, सलमान शेख आदि उपस्थित होते. कारखान्याच्यावतीने उपस्थित अधिका-यांचा सत्कार करण्यांत आला. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले, केशव होन यांनी सुत्रसंचलन केले.