निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची व पोटचाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करू  – मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. : गेली ५३ वर्षे रखडलेले निळवंडे धरणाचे काम भाजप-शिवसेना युती सरकारमुळे मार्गी लागले आहे. निळवंडे धरणाच्या उजवा कालव्याच्या व इतर कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निळवंडे धरणाच्या चाऱ्यांची व पोटचाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करावी आणि निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या जिरायत भागातील गावतळी, पाझर तलाव, ओढे-नाल्यांना या धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचा सरकार नक्की विचार करेल व त्याप्रमाणे निश्चितच कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Mypage

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डावा कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज बुधवारी (३१ मे २०२३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निंब्रळ (ता. अकोले) येथे जलपूजन करून झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड,

Mypage

भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, जलसंपदा विभागाचे अभियंता अरुण नाईक, विवेक लव्हाट आदींसह निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जवळके, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, अंजनापूर, वेस, सोयगाव, बहादराबाद, धोंडेवाडी, शहापूर, काकडी, मल्हारवाडी या ११ गावांचा निळवंडे धरणाच्या कालवा लाभक्षेत्रात समावेश असून, या जिरायती भागातील सुमारे १३ हजार ९९६ एकर क्षेत्र निळवंडे धरणामुळे ओलिताखाली येणार आहे. मात्र, या भागात अद्यापही वितरीकांची व सिंचन व्यवस्थेची कुठलीही कामे सुरू झालेली नाहीत. ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या ११ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. त्याचप्रमाणे डावा कालव्याच्या चाचणीसाठी सोडलेल्या पाण्यातून या भागातील गावतळी, पाझर तलाव, ओढे-नाले भरून द्यावीत.

Mypage

तसेच आगामी काळात ओव्हरफ्लोचे पाणी या भागाला मिळावे, जेणेकरून या भागातील पशुधन जगविण्यासाठी व चारा पिकासाठी या पाण्याचा उपयोग होईल, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात खास उल्लेख करून स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही दिली. 

Mypage

निळवंडे धरणाचे पाणी जिरायत भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मिळावे आणि या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, असे स्वप्न माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी पाहिले होते. त्यासाठी स्व. कोल्हेसाहेब आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडे धरणाचे व कालव्यांचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. अखेर आज निळवंडे धरणाच्या डावा कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी झाली आहे. त्यामुळे आनंदित झालेले लाभक्षेत्रातील शेतकरी यावेळी भावूक झाले होते. लाभधारक शेतकऱ्यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना भेटून स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी काय-काय प्रयत्न केले त्याला उजाळा दिला. एका कार्यकर्त्याने स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाया पडून ताई, स्व. कोल्हेसाहेब व तुम्ही आमच्या प्रश्नाला वाचा फोडून आम्हाला न्याय दिला. निळवंडे धरणाच्या डावा कालव्याचे काम पूर्ण होऊन आज जलचाचणी झाली. त्यामुळे आम्ही खुश झालो आहोत. याप्रसंगी निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचा सत्कार केला.