शेवगाव, जुगार अड्यावर छापा, ६५  हजाराचा मुद्देमाल जप्त, १२ जणांना घेतले ताब्यात

शेवगाव प्रतिनिधी, दि .१3 :  शेवगावला  नुकतेच रुजू झालेले  उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील ॲक्शन मोडमध्ये आले असून शहरातील मध्यवर्ती व रहदारीच्या ठिकाणी राज रोस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर त्यांच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १२ जणांना  रंगे हात पकडून त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करून  त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे . पाटील यांच्या या कारवाईबद्दल जनतेतून अभिनंदन  होत आहे.       उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने रविवार  दि ११ जूनला रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई केली.

       याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संतोष हरिभाऊ वाघ यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील जैन गल्ली परिसरात सुरू असलेल्या  जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने धाड टाकून रामभाऊ जगन्नाथ कुसळकर, संभाजी नवनाथ कुसळकर , रमेश सोनाजी सुपारे , बाळू गंगाराम लष्करे, संतोष किसन माने, संजय गोविंद सुपारे  सर्व राहणार वडार गल्ली, भाऊसाहेब रंगनाथ रोडगे,  इदगा मैदान, प्रताप गहिनीनाथ काटकर, राहणार धनगर गल्ली, बाळासाहेब चंद्रहार सावंत, राहणार आखेगाव रोड, संतोष केशरमल भंडारी लांडे वस्ती, संदीप रोहिदास रमंडवाल इंदिरानगर, मंगेश रमेश महाजन जैन गल्ली शेवगाव या बारा जणा विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ अ प्रमाणे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुधाकर दराडे पुढील तपास करत आहेत.

       मध्यंतरी शेवगावात झालेली दंगल येथे मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या  मावा, घुटका, गांजा, जुगार दारु अशा अवैध धंद्यामुळेच घडल्याचा  निष्कर्ष वेळोवेळी पहाणीसाठी आलेल्या शासन व प्रशासनाच्या मान्यवरांसमोर तमाम जनतेकडून व्यक्त करण्यात आला होता उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील  यांची जुगार अड्या वरील ही कारवाई  शेवगावच्या कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्याचे संकेत देत असल्याने  असेच धडाकेबाज कार्य त्यांचे हातून घडो अशी शेवगावकरांची अपेक्षा आहे.