भगनाथ काटे यांचे जीवन देवदूतासारखे – राम महाराज झिंजर्के 

शेवगाव प्रतिनिधी, दि १४ : स्वतः पुरते जगण्या पेक्षा इतरांसाठी जगणार्‍यांचे, झिजणार्‍यांचे, समाजातील अडलेल्या नडलेल्या गरजू साठी मदतीचा हात देणार्‍यांचे जीवन अर्थपूर्ण असते, ते चीर स्मरणीय ठरते. अशा जीवनासाठी संस्काराची गरज असते. येथील ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी भागनाथ काटे यांनी नोकरी बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रात  देवदूता सारखे कार्य केल्याने त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले आहे.

अशा शब्दात काटे यांचा गौरव आखेगावच्या सद्गुरु जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजूर्के यांनी केला. येथील ग्रामीण रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी भागनाथ काटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पार पडलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात राम महाराज बोलत होते.

      अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनाली बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास माजी आमदार चंद्रशेखर घुले, भोर येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, बालरोग तज्ञ डॉ. शरद कचरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, पाथर्डी कृ उ. बाजार समितीचे संचालक शेषराव कचरे, ज्ञानेश्वरचे संचालक बबनराव भुसारी, सुभाष  दिवटे, केदारेश्वरचे  संचालक माधव काटे,  सुभाष ताठे, डॉ.  संजय लड्डा, उचल फौंडेशनचे सचिन खेडेकर यांचेसह नातेवाईक  व शेवगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी महाराज म्हणाले की, काटे यांनी नोकरी सांभाळून रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून तर जागर ग्रुप, सायकल क्लब , उचल फाउंडेशन, गुड मॉर्निंग क्लब आदि संस्थाचे मार्गदर्शक सदस्य म्हणून  सामाजिक जाणिवेतून काम केले. काटे यांची परिस्थिती जेमतेम होती. आईवडिल निरक्षर, गरीब, मात्र आई  लिलाबाई, वडिल जनार्दन काटे यांचे  उत्तम संस्कार त्यांना लाभले. त्याच्याच जोरावर काटे यानी  शुन्यातून आजचे वैभव उभारले आहे. त्यांनी अनेकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे संसार उभे केले अनेक सामाजिक संस्थाना मुक्त हस्ते मदत केली. भर वस्तीतील जागा देऊन गणेश मंदिर बांधले. त्यांचेकडे गेलेला याचक कधीही विन्मुख गेला नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. आज  देखील सेवा पूर्तीच्या आनंद सोहळ्या निमित्त उचल फाऊडेंशनच्या ऊस तोड मजूरांच्या मुलांच्या निवासाला फर्शी देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय.

         ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यविषयक आवश्यक ती सर्व मदत वेळेवर उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. कोविड काळात घरचे लोक रुग्णा पासून दूर असत. अशावेळी काटे रुग्णा जवळ जाऊन  त्यांना  काय हवं  नको पहात. मानसिक धीर देत. तुटवडा असणारी इंजेक्शन, औषध उपलब्ध करून देत. लसीकरणाच्या काळात लोक अपरात्रीच नंबर लावत तेव्हाही  काटे त्यांच्या अगोदर तेथे त्यांच्या मदतीसाठी देवदूतासारखे उपस्थित असत.

    परमेश्वर अशा कामाची  पोहच देत असतो. तशी पोहच काटे यांना मिळाली आहे. आज त्यांची आर्थिक स्थिती भक्कम असून  वयाच्या ६० व्या वर्षी ते स्वतः व पत्नी मंदाकिनी त्यांचे आई वडिल सर्वजण प्रकृतीने ठणठणीत आहेत. मुलगी डॉ. सोनाली कचरे, जावई प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. शरद कचरे, मुलगा डॉ. शुभम  एमबीबीएस, एम.डी मेडिसीन,  सुन डॉ.  कांचन रेवडकर एमबीबीएस, व नात चि.  सायुरी अशा चार पिढ्या मंचावर आहेत. असले वैभव कोणाच्या ही वाट्याला येत नाही.

   डॉ . बांगर म्हणाल्या की, काटे यांनी विविध शासकीय विभागाच्या समन्वयातून शेवगाव तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेली ऊर्जा महत्वपूर्ण आहे .लोकांच्या निरपेक्ष सेवेतून केलेले काम इतरांसाठी  प्रेरणादायी आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र कचरे,  बापूसाहेब गवळी, संदिप पायघन,  संजय फडके, सुरेश पाटेकर, प्रा किसनराव माने, अशोक पाथरक,  अॅड निळकंठ बटुळे  यांची भाषणे झाली. यावेळी  राज्यभरातून आलेल्या  शेकडो मित्रांनी काटे परिवारास हार, पुष्पगुच्छ, शाल, महावस्र देऊन शुभेच्छा दिल्या. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभम  यांनी आभर मानले.