शेवगावमध्ये दीड महिन्यापासून पावसाने मारली दडी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला, मात्र तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस झालाच नसल्याने, पिके धोक्यात आली आहेत. गेल्या काही दिवसापासून अधून मधून हलका पाऊस सुरु असला तरी त्यास म्हणावा तसा जोर नसल्याने काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे.

शेवगाव व बोधेगाव परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याची नोंद असली तरी ढोरजळगाव एरंडगाव परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्या परिसरातील शेतकर्‍याना जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

लुक्याचे खरिप हंगामाचे उद्दीष्ट ८५ हजार हेक्टर क्षेत्र असून ऊस वगळता खरिपाचे लागवडी खालील क्षेत्र सरासरी ५६ हजार हेक्टर आहे. तालुक्यात आता पर्यंत ६० हजार ७०९ हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत . त्यात कापसाची सर्वाधिक ४५ हजार ३८ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे.

मागील हगामातील कापसाची खरेदी  अद्याप सुरु असून १० पर्यंत आद्रता असलेल्या कापसाला ६ हजार ८०० ते ६ हजार ९५० रु .प्रति क्विटंल भाव आहे. संबंधित शेतक-यांना कापसाचे पेमेंट रोख स्वरूपात मिळत असस्याची माहिती श्री मारुतराव घुले पाटील जिनिंग प्रेसिग    संस्थेतून सांगण्यात आली .

तालुक्यात यंदाच्या खरिपात नगदी पिक असलेल्या तूर – ८ हजार ३१७ हेक्टर, बाजरी – एक हजार ६६४ हेक्टर, मुग ३७५ हेक्टर, आदि पिकांची पेरणी झाली आहे. मागील वर्षी ऊसाची १६ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती. यंदाच्या हगामासाठी ऊस लागवड अजून सुरु झाली नसली, तरी नजीकच्या काळात होणार्‍या पावसावर ऊस लागवडीस वेग येईल.

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात आज आखेर १६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या सरासरी ३० टक्के झाला आहे. मंडल निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे – शेवगाव- २०६ मिमी, बोधेगाव – २००, चापडगाव –   १६६ , भातकुडगाव – १५७, ढोर जळगाव – १२३ व एरंडगाव ११३ मिलिमीटर.