कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०१ : यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेसाठी अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची, मुदत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीवरून केंद्र सरकारने पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवली असून, या निर्णयाबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
युवा नेते विवेक कोल्हे यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. पेरणी ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. महाराष्ट्रात २०१६ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे.
आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून, पुढील तीन वर्षांसाठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून या नवीन पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा काढून मिळणार आहे. या पीक विमा योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. कारण, सरकारच आता पीक विम्याची रक्कम भरणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकांसाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार आहे.
सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँक किंवा संकेतस्थळ व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन नोंदणी करून, पीक विम्यासाठी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती, परंतु कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यात अनेक भागात इंटरनेटची समस्या आहे. तसेच सर्व्हर सतत डाऊन राहत असल्यामुळे, अनेक शेतकरी अद्याप पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज व नोंदणी करू शकले नाहीत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्यांना सहभागी होता येणार नाही. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी तांत्रिक कारणांमुळे कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य करून ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची म्हणजे ३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन त्यांना मोठा दिलासा दिला आहे, असे विवेक कोल्हे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घेतल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. राज्य सरकारच्या मागणीवरून केंद्र सरकारने ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्यांनी ३ ऑगस्टपर्यंत संबंधित पोर्टलवर आपले अर्ज भरून पीक विमा उतरवावा व जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले आहे.