कोपरगाव शहरालगतचा भाग नगरपरिषद हद्दीत समाविष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नागरिकांनी मानले आभार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे कोपरगाव शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागाचा कोपरगाव नगर परिषद हद्दीत समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. हद्दवाढ केल्याबद्दल तसेच नवीन हद्दवाढ भागात पाणी, रस्ते, गटारी, पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासनाने १० कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.  

स्नेहलता कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शहरालगतचा हा भाग नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झाला. हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी शासनाची खास तरतूद असते. त्यानुसार शासनाच्या धोरणानुसार या हद्दवाढ भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, गटारी व इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नगरपरिषदेला शासनाकडून निधी मिळणे क्रमप्राप्त होते. स्नेहलता कोल्हे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून या भागाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी लावून धरली.

अखेर त्यास यश मिळाले व शासनाने हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते व इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रस्ता अनुदान योजना व इतर योजनांतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून हद्दवाढ झालेल्या भागात मूलभूत सोयी-सुविधा व अन्य विकास कामे होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याबदल या भागातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

शासनाने १० कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल नागरिकांकडून आभार मानण्यात आले. कोपरगाव शहरालगतच्या हद्दवाढ झालेल्या दुल्हनबाई वस्ती, आदिनाथ सोसायटी, कर्मवीरनगर, नाईकनगर, गवारेनगर, सह्याद्री कॉलनी, शंकरनगर, पवार वस्ती, ओमनगर, गवारे वस्ती, ब्रिजलाल नगर, आढाव वस्ती, रानोडे वस्ती, साबळे वस्ती, देवकर प्लॉट, मुर्शतपूर शिव रस्ता पूर्व बाजू, द्वारकानगरी, गोकुळनगरी, अयोध्यानगरी, धोंडिबानगर, हनुमाननगर व परिसरात रस्ते, पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागातील नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या परिसराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता तसेच या भागासाठी हद्दवाढ झाल्याने नियमानुसार शासन विकासकामांची तरतूद करत असते. त्या अंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर आहे. या भागाचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सततच्या प्रयत्नांबद्दल या परिसरातील नागरिकांनी स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले आहेत

कोपरगाव शहराचा विस्तार आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहराचा विस्तार वाढत चालला आहे. शहरालगत दुल्हनबाई वस्ती, आदिनाथ सोसायटी, कर्मवीरनगर, नाईकनगर, गवारेनगर, सह्याद्री कॉलनी, शंकरनगर, पवार वस्ती, ओमनगर, गवारे वस्ती, ब्रिजलाल नगर, आढाव वस्ती, रानोडे वस्ती, साबळे वस्ती, देवकर प्लॉट, मुर्शतपूर शिव रस्ता पूर्व बाजू, द्वारकानगरी, गोकुळनगरी, अयोध्यानगरी, धोंडिबानगर, हनुमाननगर अशी अनेक छोटी-मोठी उपनगरे वसलेली आहेत.

पूर्वी कोपरगाव ग्रामीण म्हणून ओळखला जाणारा हा त्रिशंकू परिसर कोपरगाव नगर परिषद हद्दीत समाविष्ट नसल्यामुळे या परिसरातील नागरिक पाणी, रस्ते, वीज, भूमिगत गटारी, पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित होते. हा भाग नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर असल्याने नगरपरिषदेकडून दुप्पट पाणीपट्टी आकारली जात होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या परिसराचा नगरपरिषद हद्दीत समावेश व्हावा, अशी या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. सन २०१४ ते २०१९ या काळात राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर होते.

तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कोपरगाव शहरालगतचा हा भाग नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव शहरालगतचा पूर्वी ग्रामीणमध्ये असलेला हा त्रिशंकू भाग कोपरगाव नगर परिषद हद्दीत समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि २२ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.