स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची ग्वाही
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी रक्कम देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची सुमारे सात कोटी रुपये थकबाकी असून, ती तातडीने ग्रामपंचायतला देण्यात यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर सदर थकीत कराची रक्कम त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस व पवार यांनी दिली.
गुरुवारी (१७ ऑगस्ट) काकडी येथे शिर्डी विमानतळालगत आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आले असता, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून याबाबत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काकडी ग्रामपंचायतच्या सरपंच पूर्वाताई गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, कानिफनाथ गुंजाळ, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय डांगे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब मोरे, इंद्रभान गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
शिर्डी हे जागतिक ख्यातीचे देवस्थान असून, येथे श्री साईबाबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज असंख्य भाविक येतात. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्याच कार्यकाळात १ ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते.
या विमानतळावरून २०१७ मध्ये विमानसेवा सुरू झाल्यापासून काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतला मालमत्ता व इतर करापोटी मिळणारे सुमारे ७ कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे थकले आहेत. तसेच चालू वर्षाचा करही थकीत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व विकास कामांकरिता सदर थकीत कराची रक्कम त्वरित मिळावी म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यामार्फत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे.
मात्र, अद्यापही याबाबत योग्य कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामपंचायतला विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सदर कराची थकीत रक्कम मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांकडे आलेला असून, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे थकीत असलेली कराची सुमारे सात कोटी रुपयांची रक्कम तातडीने देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.