कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकतेच प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रीस देशातील शिक्षणतज्ञ राणी या लंपाऊ यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे या प्रबोधिनीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी राणी या लंपाऊ यांनी ‘उच्च शिक्षण व श्रमिक बाजार यांच्यातील तफावत’ या विषयावर मार्गदर्शन करताना उच्च शिक्षण व श्रमिक बाजार यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांवर प्रकाशझोत टाकला.
त्या बरोबरच त्यांनी उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी इंडस्ट्रीच्या गरजेनुसार अद्यायावत अभ्यासक्रम, शैक्षणिक संस्था व औद्योगिक संस्था यांच्यातील संवाद, शैक्षणिक संस्थांचा संशोधन व विकास उपक्रमात सहभाग, अनुभव व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, बदलते व गतिमान कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विविध बाबींवर भर दिला. उच्च शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांना श्रम बाजारात सहज सामावून घेता येईल असे कौशल्यप्रधान शिक्षण उपब्धत करून दिले तर बेरोजगारीचा प्रश्न राहणार नाही. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी प्राध्यापक प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. (डॉ) विजय ठाणगे यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत करून महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून विविध विषयांवर संपन्न होत असलेल्या व्याख्यानांची उपयोगिता स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी प्राध्यापक प्रबोधिनीचे महत्त्व प्रतिपादित करताना या प्रबोधिनीद्वारे वर्षभर राबवित असणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सखोल माहिती दिली.
याप्रसंगी प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख डॉ. आर. के. कोल्हे, कला शाखाप्रमुख प्रो. (डॉ) के. एल. गिरमकर, वाणिज्य शाखाप्रमुख प्रो. (डॉ) एस. आर. पगारे, विज्ञान शाखाप्रमुख प्रो. (डॉ) बी. बी. भोसले यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एन. टी. ढोकळे, डॉ. एस. बी. भिंगारदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले.