कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव तालुक्याला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून मंत्रालयात होणाऱ्या आर.डी.एस.एस. च्या मिटिंगमध्ये तालुक्यातील ऊर्जा विभागाच्या सर्व कामांचा समावेश करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आ. आशुतोष काळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेवून कोपरगाव तालुक्यातील वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के. व्ही. सबस्टेशनला जोडण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे हे सबस्टेशन तातडीने जोडण्याच्या कामाला गती द्या.
कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी वारी व रवंदे सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये निधी दिला आहे. या निधीतून या सबस्टेशनच्या पॉवर रोहीत्रांची क्षमता ३.१५ एम. व्ही. ए. वरून ५ एम. व्ही. ए. पर्यंत वाढणार असून वारी सबस्टेशनचे काम पूर्ण होवून हे सबस्टेशन कार्यान्वित झाले आहे. मात्र ब्राम्हणगाव सबस्टेशनचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून या कामांची गती वाढवून लवकरात काम पूर्ण करा.
मंजूर असलेल्या चांदेकसारे नवीन सबस्टेशनच्या निविदा प्रक्रिया लवकरात लवकर प्रसिद्ध करा. आर.डी.एस.एस. अंतर्गत मंजूर असलेले रवंदे सबस्टेशनसह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून वीज ग्राहकांना चांगली सेवा द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीसाठी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रशांत खांडेकर, उपकार्यकरी अभियंता लक्ष्मण राठोड, सहाय्यक अभियंता किशोर घुमरे आदी उपस्थित होते.