यशस्वी चांद्रयान-३ मोहीम भारतासाठी ऐतिहासिक अविस्मरणीय दिवस – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : भारताने बुधवारी संध्याकाळी ‘चांद्रयान-३’ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करून जगात नवा इतिहास रचला आहे. संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक, गौरवास्पद व अभिमानास्पद व अविस्मरणीय दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान-३’ चे यशस्वी लँडिंग करून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गरुडझेप घेतली असून,

भारताच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, अशा शब्दांत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला आहे. कठोर मेहनत घेऊन ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी केल्याबद्दल ‘इस्रो’ च्या सर्व वैज्ञानिकांचे स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

स्नेहलता कोल्हे यांनी श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन या मोहिमेसाठी यश मिळावे यासाठी प्रार्थना केली होती.

भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, भाजप, भाजयुमो, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी हातात तिरंगाध्वज घेऊन ‘भारतमाता की जय,’ ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा देत पेढे वाटून, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश असून, चंद्रावर यानाची यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनला आहे. विकसित भारतासाठी आजचा हा क्षण ऐतिहासिक, महत्त्वाचा व भारतासाठी नवी चेतना देणारा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती होत असून, भारताची जागतिक महासत्तेकडे घोडदौड सुरू आहे. त्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-३’ चे यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

२३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग झाले आहे. ‘चांद्रयान-३’ सुरक्षितपणे चंद्रावर उतरावे आणि ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मी शिर्डीच्या श्री साईबाबांचे दर्शन घेऊन विशेष प्रार्थना केली होती. अखेर ‘चांद्रयान-३’ चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे मला अतिआनंद झाला आहे.

‘चांद्रयान-३’ मोहिमेत अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व ‘इस्रो’मध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा सक्रिय सहभाग असून, महाराष्ट्रातील राजुरी येथील आसिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणीही पोहोचू शकलेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘इस्रो’च्या संशोधकांची, वैज्ञानिकांची साथ मिळाली आणि आज ‘चांद्रयान-३’ मधील विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग झाले आहे. या मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सतत पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. ‘चांद्रयान-३’ ही मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि आकांक्षांचे तसेच भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञांच्या जिद्द व चिकाटीचे प्रतीक आहे.

‘इस्रो’ च्या सर्व वैज्ञानिकांनी ‘चांद्रयान-३’ चे चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी बजावली असून, अवकाश संशोधन क्षेत्रातदेखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. अमेरिका, चीन, रशिया यांसारख्या विविध देशांच्या अवकाश तंत्रज्ञानातील स्पर्धेत आपण मागे नसल्याचे व भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे हे आज आपल्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. ‘चांद्रयान-३’ मोहीम केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.

यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळणार आहे. चंद्रावर असलेल्या हेलीयम-३ या खनिजाच्या अस्तित्वामुळे भविष्यात चंद्र हा एक मोठा इंधनाचा स्त्रोत ठरणार आहे, असेही त्या म्हणाल्या. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि बर्फाचे मोठे साठे आहेत. चंद्राचा हा भाग अंधारात राहतो. येथे असलेले पाणी महत्त्वाचे असून, त्याचे पिण्यासाठी, ऑक्सिजन आणि हायड्रोजन तसेच रॉकेट इंधन यांसारख्या स्त्रोतांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. यामुळेच भविष्याच्या दृष्टीने ‘चांद्रयान-३’ मोहिमेला खूप महत्त्व आहे. भारताची ही घोडदौड यापुढेही अशीच यशस्वीरीत्या चालू राहील, यात शंका नाही, असेही स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, नारायणशेठ अग्रवाल, वैभव आढाव, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद शेख पहिलवान, वैभव गिरमे, दीपक जपे, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, नरेंद्र लकारे,

जगदीश मोरे, संतोष नेरे, शंकर बिऱ्हाडे, शफिकभाई शेख, इलियासभाई खाटिक, एस. पी. पठाण, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, वासुदेव शिंदे, गौरव आढाव, भैय्या नगरे, वैभव सोळसे आदींसह भाजप, भाजयुमो, शिवसेना व रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.