पत्रकारांनी वैफल्यग्रस्ततरुणांचे प्रश्न सोडवावेत  – राम महाराज झिंजुर्के

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : समाजामध्ये वैफल्यग्रस्त तरुणांची संख्या वाढत आहे. या तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी. त्याचबरोबर समाज जागृती आणि शासनाची कानउघाडणी करण्यास लेखणीचा विशेषत्वाने वापर व्हावा, असे परखड मत आखेगाव येथील जोग महाराज संस्कार केंद्राचे ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी केले.

     शेवगाव तालुका पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्यावतीने आयोजित  पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून  राम महाराज  बोलत होते.

     यावेळी दहिगावने येथील दधनेश्वर शिवालयाचे महंत नवनाथ महाराज काळे व राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते  रेणुकामाता मल्टीस्टेटचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, नित्यसेवा हॉस्पिटलच्या सिस्टर फ्रान्सिस्का, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांना सामाजिक कार्याबद्दल तर वीरभूमीचे संपादक महादेव दळे, पत्रकार राजेंद्र पानकर, वृत्तपत्र वितरक गहिनीनाथ बडे यांना पत्रकारीतेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच अक्षय मतिमंद व उचल फाऊंडेशन यांना साहित्य वाटप करण्यात आले.  

    यावेळी राम महाराज  म्हणाले, समाज, शासन आणि अध्यात्मातील पत्रकार हा दुवा आहे. निर्भीड, निःपक्ष आणि सत्यता या गुणांनी युक्त असलेली पत्रकारिता आणि कीर्तनकार यांच्यामध्ये साम्य आहे. दोघेही समाजाला निरोप देण्याचे कार्य करत असतात. आज वैफल्यग्रस्त तरुणांसाठी पत्रकारांची लेखणी चालायला हवी, त्याचबरोबर समाजजागृती आणि शासनाची कानउघडणी करण्यासाठी लेखणीचा विशेषत्वाने उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

     नवनाथ महाराज काळे म्हणाले, समाजानेही निर्भीडपणे सत्य मांडणार्‍या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आज समाजातील अध्यात्मिक विचार, आध्यत्मिक कार्याचा सुगंध समाजात पोहचवण्याचं मोलाचं कार्य तालुक्यातील पत्रकार करत आहेत.

      यावेळी तहसीलदार छगनराव वाघ, स.पो.नि. रविंद्र बागुल, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पं.स.चे माजी सभापती अरुण पाटील लांडे,  वजीर पठाण,  संजय फडके, डॉ. संजय लड्डा, हरिष भारदे, प्रताप फडके, गणेश कोरडे, गणेश रांधवणे, दत्तात्रय फुंदे, जगदीश धुत, कॉ. संजय नांगरे, किसन माने, रामकृष्ण गोरे,  शरद सोनवणे,  सुनिल रासने, पत्रकार संघटनेचे प्रदेश प्रतिनिधी रमेश चौधरी,  नीलकंठ कराड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन सातपुते आदीसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकार  कैलास बुधवंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजू घुगरे यांनी केले तर सुरेश बडे यांनी आभार मानले.