काम, क्रोध आणि लोभाला थारा न देणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होते – इंदुरीकर महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : काम क्रोध आणि लोभ या गोष्टींना जी व्यक्ती थारा देत नाही, ती व्यक्ती जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. तालुक्यातील हसनापूर येथील बत्तीसाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवसांची कीर्तन सेवा करताना इंदुरीकर महाराज बोलत होते.

इंदूरीकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांना लोकसहभागातून डिजिटल करून मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण गावामध्येच देण्याची गरज आहे, गावांमध्ये व्यायाम शाळा उघडून तरुणांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम करावे. गावाच्या विकास कामांमध्ये एकजूट ठेऊन काम केले तरच गावचा विकास होऊ शकतो.

गावातील पुढाऱ्यांनी इतर पक्षांचे झेंडे घेऊन मिरवण्यापेक्षा गाव तंटामुक्त कसे होईल, गावातील तरुणांमधील व्यसनाधीनता कमी कशी होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जेव्हा गाव सक्षम होईल तेव्हाच राष्ट्र सक्षम होईल. यावेळी ह.भ.प. माणिक महाराज ढाकणे, भागिनाथ अण्णा  ढाकणे, सतीश महाराज, उद्धव महाराज यांच्यासह परिसरातील वादक गायक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.