गणरायाला शेवगावात शांततेत भावपूर्ण निरोप

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ :  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात श्री गणरायाला शेवगाव शहर व तालुक्यातून शांततेत भावपूर्ण निरोप देण्यात आला. बॅण्ड, ढोल-ताशा, सनई चौघड्याच्या पारपारिक वाद्याच्या तालात तसेच लेझीम, झांज, टाळ – मृदुंगाच्या जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या अनुक्रमे लाटे, भोईराज, शिवशक्ती, भगतसिंग व बालाजी या पाच सार्वजनिक मंडळांनी  सहभाग घेतला. शेवटच्या गणेश मंडळाचे विसर्जनाला रात्रीचे साडे अकरा वाजले.

   गुलाल व फुलांची होणारी उधळण व शेवटी अधून मधून झालेल्या रिमझीम सरींनी गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. परंपरेनुसार सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव जाधव यांच्या पेशवेकालीन गणपतीची व त्यानंतर लाटे यांच्या मानाच्या गणपतीची तहसीलदार प्रशांत सांगडे, विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, गटविकास अधिकारी राजेश कदम, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे हस्ते आरती झाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास विसर्जन मिरवणूक सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी बाबासाहेब गरड, सुनिल रासने, अशोक आहूजा,  महेश लाटे, अचल लाटे, अतूल रासने, दिपक आहूजा, बापू धनवडे, राहूल दहिवाळकर, शामराव पुरोहित, प्रा. जनार्दन लांडे पाटील आदींसह गणेश भक्तांची उपस्थिती होती.   

शहरातील विविध मंडळांनी स्वतंत्ररीत्या मिरवणुका काढून दुपारच्या आत आपआपल्या सार्वजनिक मंडळाच्या श्रीगणेशाचे स्वतंत्रपणे विसर्जन केले. पोलीस मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यासह सहाय्यक पोलीस आशिष शेळके, दिपक  सरोदे, यांच्यासह ‘खाकी ‘ ने सर्वप्रथम विसर्जन करून अन्य मंडळाच्या बंदोबस्तास सज्ज झाले भोईराज तरुण मंडळाच्या झांज व ढोल पथकाने तसेच ठीकठिकाणी गुलाल व फुलांची उधळण करणाऱ्या  लोखंडी तोफने तसेच शिवशक्ती युवक मंडळाच्या महिला पथकाने टाळ मृदुंगाच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले.

शेवगावात गणपती विसर्जनाच्या पूर्व संधेला एक दिवसासाठी जीवंत देखावे सादर करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा भोईराज तरुण मंडळाने  मच्छिद्रनाथ व गोरक्षनाथ भेट, श्रीकृष्ण मंडळाने मंगळागौर, भगतसिंग मंडळाने वामन बळीराजा, टिळक मंडळाने श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने पेलल्याचा देखावा सादर केला. यात तब्बल ५० बाल गोपाल  सहभागी  होते. शिवशक्ती मंडळाने “ताटी उघडा जानेश्वरा ” जिवंत देखाव्याने गणेश भक्तांची वाहवा मिळविली.

यावर्षी संपूर्ण गणेश उत्सवात व विसर्जन सोहळ्यात डीजे वाजला नाही. दीर्घ काळ पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे विसर्जन मार्गावर होणाऱ्या उच्चांकी गर्दीला ओहोटी. स्थानिक पोलिसासह होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त गोता. तर यावर्षी प्रथमच मिरवणुकीत बंदुकधारी पोलिस आढळले.

जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांनी गणेशोत्सवाच्या प्रारभीच बैठक घेऊन विसर्जन मिरवणुक मार्गाच्या डागडुजी बद्दल व सुरळीत वीज पुरवठ्या बाबत पहाणी करून सूचना देऊनही शहीद भगतसिंग चौकातील मिरवणूक मार्गातील खड्डे बुजविण्यात आले नसल्याने मानाच्या भगतसिंग गणेश मंडळाने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास व मिरवणुकीत सहभागी होण्यास नकार दिला. यावेळी शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने स्थानिक कार्यकर्ते, महसूल व पोलिस अधिकाऱ्यानी मध्यस्थी करून मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतरच मंडळ  मिरवणूकीत  सहभागी झाले.