शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : सेवानिवृत्त होऊन दोन वर्षाचा दीर्घ कालावधी उलटला तरीही शेवगाव तालुक्यातील बारा प्राथमिक शिक्षकांची १४ लाख ३५ हजारांची रक्कम शेवगाव पंचायत समितीतून अद्यापी मिळालेली नसल्याची तक्रार या सेवानिवृत्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आमदार मोनिका राजळे यांच्याकडे लेखी निवेदन केले आहे.
तालुक्यातील हे बारा शिक्षक गेल्या दोन वर्षात सेवानिवृत्त झाले आहेत. या शिक्षकांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्राप्त केली नसल्याच्या कारणावरून पंचायत समितीने त्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या निवृत्ती उपदान, कुटूंब निवृत्ती वेतन व अंशराशीकरण रकमेतून काही रक्कम कपात केली आहे. त्या उलट निवृत्तीनंतर अशी कोणतीच रक्कम कपात करता येत नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. ही कपात करण्यास किंवा वसूल करण्यास शासनाच्या आदेशानेच स्थगिती असतांना देखील शेवगाव गट विकास अधिकाऱ्यांनी आपणास या बाबीचे अवलोकन होत नसल्याचे सांगून पुढील आदेश येईपर्यंत ही रक्कम शिक्षकांना दिलेली नाही.
याबाबत संबंधित शिक्षकांनी आपण उशिरा संगणक परीक्षा उत्तीर्ण झालो असलो तरी कार्यरत असतांना त्याचा आमचे संगणक कामकाजावर कुठलाही परिणाम होऊ दिलेला नाही हे नमूद करून शेवगाव पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, लेखा व वित्त विभाग यांच्याकडे प्रलंबित रकमे बाबत मागणी केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही रक्कम देण्यास तोंडी सहमती दर्शविली. मात्र, गट विकास अधिकारी स्तरावर कार्यवाही होत नसल्याने हे निवृत्त शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्वरित तोडगा काढावा अशी त्यांची मागणी आहे.
तालुक्यातील अलका भाग्यवंत, सुंदर चव्हाण, मीनाक्षी गवते, अलकनंदा नागरे, तारा अडसुरे, लताबाई वारे, आशा मरकड, विलास हुशार, अशोक कचरे, आयोध्या बर्डे, लहू शिंदे, सुधाकर लाहासे या सेवानिवृत्ती शिक्षकांची एकूण तब्बल १४ लाख ३५ हजार १९२ रुपये रक्कम कपात झाली असून त्यात अलका भाग्यवंत यांची सर्वाधिक तीन लाख ३७ हजारांची रक्कम आहे, तर पाच जणाची लाखाच्यावर कपात करण्यात आली आहे.