शासनाने सहकारी दूध संघांना सर्टिसिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे गरजेचे – परजणे

गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळालेली असून भविष्यात या व्यवसायाला अधिक गती मिळण्यासाठी व जातीवंत गाईंची संख्या वाढविण्यासाठी शासनाने राज्यातील सहकारी दूध संघांना सॉर्टडसिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली. या ठरावास सर्व सभासद व दूध उत्पादकांनी एकमताने मंजुरी दिली.

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदावरुन राजेश परजणे यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयीची माहिती दिली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेव परजणे (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.

गोदावरी दूध संघाने संशोधन आणि विकासाला प्राधान्य दिल्याने कामकाजात आधुनिकता आणलेली असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात कामकाजाला गती आणली असल्याचे सांगून परजणे यांनी पुढे सांगितले की, उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये ४१ केंद्रांमार्फत कृत्रिमरेतन गर्भधारणा उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जातीवंत गाईंची पैदास केली. याशिवाय संघाने भारतात सर्वप्रथम गोदावरीच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेनसारखा उपक्रम राबवून ३० ते ३५ लिटर दूध देणाऱ्या गाईंची पैदास करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण करुन दिली.

हा कार्यक्रम राबविताना सॉर्टेडसिमेनचा दर प्रत्यक्षात १ हजार ५० रुपये असताना दूध उत्पादकांकडून केवळ चारशे रुपये एवढे नाममात्र शुल्क संघ आकारतो. यासाठी संघ दरमहा सव्वा दहा लाखाहून अधिक रुपये खर्च करीत आहे. दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी कार्यक्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून जातीवंत गाई, म्हशी व शेळ्यांची पैदास, कृत्रिमरेतन, पशुआरोग्य, लसीकरण, वैरणविकास, खनीजमिश्रण, बालसुग्रास, स्वयंसहाय्यता महिला बचतगट अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते.

पशुरोग निदान प्रयोगशाळा व पशुसंवादिनी या उपक्रमामार्फत जनावरांच्या आजाराबाबत व त्यावर करावयाच्या उपराचाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. या सुविधांमुळे दूध उत्पादकांना घरबसल्या माहिती मिळते. पशुरोग निदान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जनावरांच्या आजाराबाबत काळजी घेण्यात येते. संघाने गांव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था व सेंटरच्या दूध उत्पादकांना गायी खरेदीकरिता प्रवरा सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमार्फत सुमारे ४ हजार शेतकऱ्यांना ४५ कोटी रुपयाचे कर्ज अनुदान रुपाने उपलब्ध करून दिलेले आहे.

दुग्ध व्यवसाय करीत असताना अनेक चढ उतार आलेत. अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागले, तरी देखील खचून न जाता खंबीरपणे तोंड देऊन आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलो. दूध दरातील अस्थिरतेमुळे बाजारपेठेत वितरीत होणाऱ्या दूध विक्रीवरही त्याचा परिणाम झालेला आहे. या व्यवसायात दूध दरात स्थिरता येणे गरजेचे आहे, दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील दूध उत्पादकांच्या अडचणी विचारात घेऊन दुधाला दर वाढवून देण्याच्या उद्देशाने समिती गठीत करुन ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे.

अशातच बटर व पावडचे दर कमी झाल्याने दूध दरासाठी दूध संघांना कसरत करावी लागत आहे असे असले तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. संघाचे संस्थापक नामदेवरावजी परजणे आण्णा यांनी संघासाठी आणि दूध उत्पादकांसाठी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेऊन आमची वाटचाल सुरु आहे. प्रामाणिकपणा, सचोटी आणि चिकाटी ही धोरणे राबविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

संघ व बायफ संस्थेच्यावतीने कृत्रिम रेतन करतांना सिमेन स्ट्रॉ १९६ वरुन ३७ डिग्रीपर्यंत आणण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असते, असे पाणी दूध उत्पादकांना घरातून गरम करून द्यावे लागते, त्यामध्ये पाण्याचे तापमान कमी जास्त होऊ शकते. त्याचा परिणाम गायींच्या गर्भधारणेच्या प्रमाणात फरक पडू शकतो. म्हणून गायींचे गर्भधारणेचे प्रमाण वाढविण्यासाठी कृत्रिम रेतनतज्ज्ञांकडे मोटारसायकलच्या बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणाचे इलेक्ट्रीक फॉईन मॉनिटर देण्यात आलेले आहे.

संघाने १.५ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारणीचे कामकाज हाती घेतलेले असून सदरचे कामकाज शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे. सदरचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वीत होईल. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (आनंद) यांच्या संयुक्त सहकार्याने संघ परिसरातील दूध उत्पादकांना बायोगॅस (गोबरगॅस) संयंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करून देत आहोत. हे बायोगॅस संयंत्र संघ परिसरामध्ये सुमारे पाच हजार कुटुंबांना देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या उपक्रमाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे.

संघाचे दूध उत्पादक लक्ष्मणराव शिंदे यांची कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, संचालक विवेक परजणे, उत्तमराव डांगे, भाऊसाहेब कदम, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेब काळवाघे, सुदामराव कोळसे, जगदीप रोहमारे, संजय टुपके, भिकाजी झिंजुर्डे,

दिलीप तिरमखे, सुनंदाताई होन, सरलाताई चांदर, सुमनबाई शिंदे तसेच नानासाहेब सिनगर, भागवतराव धनवटे, संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, सुभाषराव होन, उत्तमराव माने, निवृत्ती नवले, यशवंतराव गव्हाणे, भिकाजी थोरात, सदाशिव कार्ले, सीताराम कांडेकर, कैलास पायमोडे, बद्रीनाथ बल्टे, दत्तात्रय शितोळे, प्रभाकरराव मलिक, सोपान चांदर, बाळासाहेब रहाणे, बाबासाहेब कोताडे यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष गोपीनाथ केदार यांनी आभार व्यक्त केले.