शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात रविवारी विधिवत घटस्थापना करुन शारदीय नवरात्रोत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला. येथील घटस्थापनेसाठी भाविकांनी श्री क्षेत्र माहूर गडहून पायी ज्योत आणली. शनिवारी तालुक्यात आगमन होतांना तीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. श्रीमंत घुले, राजेंद्र नांगरे यांनी शेवगावच्या क्रांती चौकातील पावन गणपती मंदिराच्या प्रांगणात ज्योतीचे स्वागत केले.
तर अमरापूरच्या देवस्थानात श्री रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत भालेराव यांनी सर्वांना महावस्त्रे देऊन स्वागत केले. पाथर्डी चे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके प्रा. जनार्दन लांडे पाटील व देवस्थानचे पुजारी तुषार देवा यांनी पायी ज्योत आणणाऱ्या भाविकांची पाद्य पूजा केली.
आज पहिल्याच माळेला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी पायी येऊन श्री रेणुका आईसाहेचे दर्शन घेतले. हनुमान टाकळीचे महंत रमेश अप्पा महाराज, जिल्हा सत्र न्यायाधिश तथा मोहटा देवस्थान प्रमुख सुनिल गोसावी यांनी सपत्नीक आईसाहेबाचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे संकेत आहेत.
वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा व त्यांच्या ब्रह्म वृंदानी सकाळी आई साहेबांना पुण्याहवाचन, मातृका पूजन, महारुद्र अभिषेक व सुवर्णालंकार घालून विधिवत घटस्थापना केली. त्यानंतर आईसाहेबांना पायसचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली तसेच शतचंडीयागास प्रारंभ करण्यात आला. दुपारनंतर मंदिराच्या सभागृहात संगित राजोपचार करण्यात येत असून देवस्थानाचा सर्व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे.