कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६: कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उक्कडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर हे एक जागृत देवस्थान असून, या मंदिरामुळेच उक्कडगावची दूरपर्यंत ओळख आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. उक्कडगावात अनेक दिवसांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता आला, हे गाव आज टँकरमुक्त झाले याचे मला खूप समाधान आहे. यापुढील काळातही श्री रेणुकामाता मंदिराच्या विकासासाठी व गावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
उक्कडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर रविवारी (१५ ऑक्टोबर) स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेले हे सामाजिक सभागृह नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होताना भाविक-भक्तांच्या सेवेत दाखल झाले आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे.
मतदारसंघातील जनतेला सुख, समृद्धी लाभू दे; स्नेहलता कोल्हे यांची रेणुकामातेच्या चरणी प्रार्थना नवरात्रोत्सव हा नारी शक्तीचा उत्सव आहे. आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. संकटे येत असतात; पण न घाबरता संकटांवर मात करून आपल्या सर्वांना पुढे जायचे आहे. आदिशक्ती श्री रेणुकामाता आपल्यावर येणारे संकट दूर करो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो. कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक नागरिक बंधू-भगिनींच्या व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट, सुख, समृद्धी येऊ दे, सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी श्री रेणुकामातेच्या चरणी केली.
सुरुवातीला स्नेहलता कोल्हे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुकामातेचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी घटी बसलेल्या माता-भगिनींसोबत देवीची आराधना करून त्यांनी फराळाचे वाटप केले. तसेच सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कलावती नितीन कोल्हे, मनाली अमित कोल्हे, निकिता सुमित कोल्हे, श्रद्धा ईशान कोल्हे व कोल्हे कुटुंबातील इतर सदस्य, सखाराम निकम, बबन निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रेवणनाथ निकम, चौधरी, सोनवणे, देविदास शिंदे, सरपंच विकास निकम, ज्ञानेश्वर निकम, साहेबराव सिनगर, हेमंत निकम, कोमल जाधव आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, ग्रामस्थ व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, श्री रेणुकामाता हे कोल्हे कुटुंबीयांचे कुलदैवत असून, उक्कडगावच्या श्री रेणुकामातेवर आम्हा कोल्हे कुटुंबीयांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात संपूर्ण कोल्हे कुटुंबीय उक्कडगाव येथे श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी, आरती व पूजेसाठी येत असते. श्री रेणुकामाता मंदिरात प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक-भक्त महिला घटी बसतात. त्यांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी सामाजिक सभागृह मंजूर केले.
जागेची अडचण असल्याने अनेक दिवस सभागृहाचे काम प्रलंबित होते. पण देविदास शिंदे यांनी सभागृहासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे याचा आनंद आहे. या सभागृहामुळे नवरात्रोत्सव काळात घटी बसणाऱ्या माता-भगिनींची सोय झाली आहे. येथे स्वच्छतागृहाचीही व्यवस्था केली गेली असून, सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे.
श्री रेणुकामाता मंदिराच्या विस्तारीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. उक्कडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने २० लाख रुपये खर्चून भव्य मंगल कार्यालय बांधण्यात येणार असून, त्यामुळे गावकऱ्यांची व आसपासच्या गावातील लोकांची चांगली सोय होणार आहे. मध्यंतरी काही कारणांमुळे मंगल कार्यालयाच्या कामात अडचणी आल्या.
तेव्हा मी स्वत: संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असून, आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी यामध्ये व्यक्तिश: लक्ष घालून हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करवून घ्यावे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी व आपण स्वत: उक्कडगाव ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.