कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : माझ्या मतदार संघातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे, मतदार संघाचा सर्वांगिण विकास होऊन जनता सुखी राहू दे अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी साडे तीन शक्ती पिठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नासिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी मातेच्या चरणी केली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या माळेला आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील असंख्य कार्यकर्त्यां समवेत नासिक जिल्ह्यातील वणी गडावर जावून पहाटे आदीशक्ती सप्तश्रृंगी मातेची मनोभावे विधिवत पूजा करून दर्शन घेतले. नवरात्र उत्सवात प्रत्येक भाविकांना आई भगवतीच्या दर्शनाची ओढ असते. परंतु सर्वच भाविक दर्शनासाठी जावू शकत नाही. त्यामुळे यावर्षी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात नवरात्र उत्सव निमित्ताने सर्व भाविकांना देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पावन पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी स्वत: थेट वणी गडावरून आदीशक्ती सप्तश्रृंगी मातेचे चरण स्पर्श करून पावन पादुका कोपरगावात आणल्या आहेत.
या पावन पादुकांच्या दर्शनाचा कोपरगाव मतदार संघातील सर्वच भाविकांना लाभ व्हावा यासाठी या पादुका सोमवार (दि,१६) रोजी कोपरगाव शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर, श्री लक्ष्मीआई माता मंदिर, मुंबादेवी मंदिर, श्री कालिकामाता मंदिर, श्री सप्तश्रृंगी मंदिर व श्री जगदंबा माता मंदिर या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता पावन पादुकांची श्री जब्रेश्वर मंदिरापासून कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी देखील दिवसभर भाविकांना कृष्णाई मंगल कार्यालयात या देवीच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
त्यामुळे असंख्य देवी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ज्या भाविकांना वणी गडावर जावून आदीशक्ती सप्तश्रृंगीमातेचे दर्शन घेणे शक्य नाही त्या भाविकांना विशेषत: महिला भाविकांना प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व चैताली काळे यांच्या धार्मिक संकल्पनेतून दर्शनाचा लाभ होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.