कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर काॅलेजचे ओम रविंद्र अडसुरे याची महाराष्ट्राच्या साॅफ्टबाॅल संघात तर हर्षल राजु जेजुरकरची महाराष्ट्राच्या टेनिस व्हाॅलीबाॅल संघात निवड झाली आहे. या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने संजीवनी ज्युनिअर काॅलेज शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतरही क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. अशी माहिती संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य साॅफ्टबाॅल असोसिएशन व सोलापुर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वडाळा, सोलापुर येथे राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात अहमदनगर जिल्ह्याच्या १६ खेळाडूंच्या संघात संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ओम रविंद्र अडसुरे, कुणाल राहुल भुजबळ, सत्यम सोमनाथ ठुबे व अनुराज बाळासाहेब तांबे या खेळाडूंचा समावेश होता.
या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून एकुण २८ संघांनी सहभाग नोंदविला. या सर्व संघांमधुन उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना निवडून राष्ट्रीय स्पर्धांसाठी संपुर्ण महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. यात संजीवनीच्या ओम अडसुरेची निवड झाली आहे. या ४१ व्या राष्ट्रीय ज्युनिअर साॅफ्टबाॅल स्पर्धा दिवाळीनंतर आंध्रप्रदेशातील अनंतपुर येथे होणार आहे. ओमला आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रा. अक्षय येवले यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महाराष्ट्र राज्य टेनिस व्हाॅलीबाॅल असोसिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिस व्हाॅलीबाॅल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे राज्यस्तरीय टेनिसबाॅल व्हाॅलीबाॅल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात अहमदनगर जिल्ह्यााच्या संघात संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या हर्षल राजु जेजुरकर, प्रसाद अरूण निर्मळ, करण आण्णासाहेब माताडे, स्वरूप मच्छिंद्र शेलार व सार्थक प्रविण बागडे या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून २२ संघांनी सहभाग नोंदविला.
या २२ संघांमधुन उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंमधुन महाराष्ट्राचा संघ तयार करण्यात आला, यात संजीवनीच्या हर्षल जेजुरकरची निवड झाली. हर्षलला क्रीडा प्रशिक्षक प्रा. शिवराज पाळणे व प्रा. अक्षय येवले यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी ओम, हर्षल, प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे, प्रा. येवले व प्रा. पाळणे यांचे अभिनंदन केले असुन ओम आणि हर्षला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.