शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ग्रामीण भागातील वाडीवस्ती वरील जिल्हा परिषदेच्या एक वा दोन शिक्षकी अनेक शाळेवर प्रशासनाचे दूर्लक्ष होत, असल्याने तेथील विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण रामभरोसे झाले, असल्याचे चित्र समोर आले आहे. दुर्गम भागातील वाडीवस्तीवर राहणारे मुले शिक्षणापासुन वंचित राहू नयेत. यासाठी सरकारने सन १९९२ साली खडू फळा योजने अंतर्गत दुर्गम भागातील वाडीवस्तीवर वस्ती शाळा सुरु केल्या. एक विद्यार्थी ते १० विद्यार्थी यांच्यासाठी एक किंवा दोन शिक्षकांची नेमणूक केली.
सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मोठ्या शाळेपेक्षा वाडीवस्ती वरील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक असू शकते. हे यातून स्पष्ट झाले. विविध शैक्षणीक उपक्रम तेथील शिक्षक राबवत असत. त्यातून वैयक्तिक संबध दृढ झाले. त्यामुळे तेथील अनेक विदयार्थी शिक्षकांचे कौटूंबीक नाते निर्माण झाले. अशा शाळातील विद्यार्थी विविध स्पर्धेत चमकले देखील.
मात्र, अनेक वाडीवस्तीवरील लमाण तांडया वरील शिक्षकावर तेथील भौगोलिक स्थितीमुळे नियंत्रण ठेवणे दुर्लक्षित झाले. नेमका त्याचा लाभ या शिक्षकांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यातील शैक्षणीक गुणवत्ता घसरली. काही शिक्षकांनी आपआपल्या सोईनुसार या वाडीवस्तीवरील शाळेत वर्णी लावून घेतली.
ज्या ठिकाणी १५ पर्यंत विद्यार्थी पटसंख्या आहे. त्याठिकाणी दोन शिक्षक नेमणूकीस आहेत. परंतू एकच शिक्षक शाळेत हजर असतो. कोणी अधिकारी आल्यास वा विचारणा झाल्यास दुसऱ्याचा किरकोळे रजेचा अर्ज त्याचे कडे असतो. हे दोघे शिक्षक आठ-आठ दिवसाच्या पाळ्या लावून शाळा चालवितांना आढळले आहेत.
आमचे वस्तीवर इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे १०/१२ विदयार्थी आहेत. ते शिक्षणासाठी बोधेगावला जातात. कारण वस्तीवरील शाळा चार चार दिवस बंद असते आणी शिक्षक मुलांना शिकवतच नाहीत. शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी. संभाजी तुळशिराम लादे (रहिवासी जयअंबिका वस्ती).
तालुक्यातील लाडजळगाव शिवारातील जय अंबीका या वस्तीशाळेवरील शिक्षकांनी तर कहर केला आहे. ही एक शिक्षकी शाळा असुन आठआठ दिवस या शाळेला कुलूप असते. अशी माहीती येथील रहिवास्यानी दिली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या शिक्षकांनी त्यांना पाठीशी घालणा-या अधिका-यानी येथील मुलांच्या शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे. त्यात सुधारणा व्हावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
शेकटे खुर्द ही दोन शिक्षकी शाळा आहे. परंतू येथे एकच शिक्षक हजर असतात. दुसऱ्या शिक्षकाचे ढोरजळगाव केंद्रात समायोजन केले, असल्याची माहिती मिळाली. वास्तविक पाहता बोधेगाव केंद्राअंतर्गत कोणत्याही शाळेवर समायोजन करणे आवश्यक व योग्य होते. मात्र, शिक्षण विभागाने त्यांचे थेट नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शाळेत समायोजन केले आहे. संबंधित शिक्षक नगरला राहतात. म्हणून त्यांच्या सोईनुसार समायोजन करण्यात आल्याचे समजले.