कर्मवीर भाऊराव व कर्मवीर शंकरराव काळेंना डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचे निर्णय घ्या- आ. सत्यजित तांबे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी ते बारावी हे वर्ष अतिशय महत्वाचे आहेत. या वर्षात मित्र-मैत्रिणींमुळे अभ्यासात मेरिटवर असलेला विद्यार्थी खाली येवू शकतो व खाली असलेला विद्यार्थी मेरीटवर जावू शकतो. त्यामुळे चांगले मित्र-मैत्रिणी निवडा व आयुष्याचा निर्णय घेताना कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचे निर्णय घ्या असे प्रतिपादन आ. सत्यजित तांबे यांनी केले आहे.                   

Mypage

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील रयत संकुलात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ. आशुतोष काळे होते.

Mypage

पुढे बोलताना आ. सत्यजित तांबे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहता आले याचा अभिमान वाटतो. समाजात अशा काही व्यक्ती असतात की, ज्यांच्याकडे अलौकिक उर्जा असते अशा व्यक्तीच्या  संपर्कात आल्यानंतर एक वेगळीच उर्जा व प्रेरणा मिळते अशा व्यक्तींमत्वापैकी एक व्यक्तिमत्व कर्मवीर शंकरराव काळे यांचे होते. त्यांच्या कर्मभूमीत आलो हे मी माझे भाग्य समजतो. कर्मवीर आण्णांनी अतिशय खडतर परिस्थितीत रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिले.

Mypage

त्याचबरोबर त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्यासारखे कर्मवीर घडविण्याचे देखील मोठे काम केले आहे. मी अनेक कारखाना व उद्योग समूह बघितले त्या त्या उद्योग समूहांनी आपापल्या शिक्षण संस्था मोठ्या केल्या परंतु कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समूह हा एकमेव उद्योग समूह आहे की, ज्या उद्योग समूहाने आपल्या शिक्षण संस्था उभ्या न करता फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासून संपूर्ण राज्यात रयतची वृद्धी करण्यात धन्यता मानली.

Mypage

त्यामुळे ज्या ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयात जाण्याचा योग येतो त्या ठिकाणी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचे नाव आवर्जून काढले जाते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ साली ९२ टक्के निरक्षर होती. आत्ता ९९ टक्के जनता साक्षर आहे, आपले चंद्रयान चंद्रावर जाते याचे श्रेय कर्मवीरांच्या विचारांना जात आहे. कर्मवीरांनी शिक्षण प्रसाराच्या विचारांचे जे बीज रोवले, त्या विचारांचे बीज आ. आशुतोष काळे पुढे घेवून जात असल्याचे गौरवद्गार आ. सत्यजित तांबे यांनी यावेळी काढले.  

Mypage

आपले अध्यक्षीय मनोगत वक्त करताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, समाजातील गोर-गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली. रयतच्या विस्तार वाढीसाठी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत रयत शिक्षण संस्थेलाच आपली मातृसंस्था मानून त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते.

Mypage

गाव तेथे रयतची शाळा असावी व समाजातील गोर-गरिबांची मुले शिक्षण घेवून मोठी व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार अंगीकारून जिल्ह्यासह राज्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला. शाळा, महाविद्यालय उभारणीसाठी तनमनधनाने मदत करून शिक्षण रुपी प्रकाशाने विद्यार्थ्यांचे जीवन उजळून टाकले. कर्मवीर शंकरराव काळेंनी घेतलेला तोच वसा पुढे चालविण्याची जबाबदारी सांभाळताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेला त्याग व कष्ट विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवून जीवनात यशस्वी व्हावे असा मौलिक सल्ला दिला.

Mypage

या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक सूर्यभान कोळपे, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे, जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, संभाजी काळे, माजी उपसभापती वाल्मीकराव कोळपे, शिवाजी वाबळे, बाबुराव कोल्हे, डॉ.आय.के. सय्यद, जनार्दन कोळपे,

Mypage

सोमनाथ चव्हाण, सागर कोळपे, उद्धव जाधव, रामराव जेवूघाले, सचिन कोळपे, बाळासाहेब ढोमसे, प्राचार्य प्रकाश चौरे, प्राचार्या एच. एन. गुंजाळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवरांसह रयत संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, कार्यालयीन सेवक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य प्रकाश चौरे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता पाटील व रजामुराद शेख यांनी केले तर आभार प्राचार्या एच. एन. गुंजाळ यांनी मानले.