कितीही संकटे आली तरी गणेश कारखाना यशस्वीरीत्या चालवू – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : काही मंडळी गणेश साखर कारखाना सुरळीत चालू नये, म्हणून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे. सभासद व शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे या संकटावर आम्ही निश्चितच मात करू. आज गणेशचे धुराडे पेटले आहे. गणेशच्या सभासदांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला समाधानकारक भाव दिला जाईल. तसेच सर्व सभासदांना १० किलो साखर मोफत देऊन सभासदांची दिवाळी गोड केली जाईल.

कारखान्यासह गणेशनगर परिसराच्या प्रगतीसाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा गणेश कारखान्याचे मार्गदर्शक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. हक्काच्या पाण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

गणेशनगर (ता. राहाता) येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कारखानाच्या संचालिका शोभा गोंदकर व एकनाथ गोंदकर, संचालक अनिल टिळेकर व सुनीता टिळेकर, नानासाहेब नळे व कमल नळे, आलेश कापसे व कमल कापसे, संपत चौधरी व मंगल चौधरी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले.

यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, सुरेश थोरात, गंगाधर चौधरी, सुधीर म्हस्के, लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे, जगन्नाथ वाकचौरे, अप्पासाहेब बोठे, शिवाजी लहारे, भाऊसाहेब चौधरी, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, नानासाहेब शेळके, चंद्रभान धनवटे, भाऊसाहेब थेटे, कोंडाजी लांडगे, अनुप दंडवते, अरविंद फोपसे, विक्रांत दंडवते, अॅड.पंकज लोंढे, रामभाऊ बोरबने, एल. एम. डांगे, संजय सरोदे, प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले आदींसह सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सुधीर लहारे यांनी केले.याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले, गणेशनगर परिसराची कामधेनु असलेला गणेश साखर कारखाना वाचविण्यासाठी व या परिसराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत गणेश कारखान्यासमोर काही नैसर्गिक तर काही कृत्रिम संकटे आली आहेत. आम्ही सहकारात राजकारण आणत नाही. पण काही मंडळी राजकारण करून गणेश कारखान्यासमोर अडचणी निर्माण करत आहे. गणेश कारखान्याने यावर्षीच्या हंगामात अडीच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गणेशचे चक्र फिरणार असले तरी उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी पाण्याची उपलब्धता व नियोजन होणे गरजेचे आहे. गोदावरी कालव्याद्वारे मिळणारे हक्काचे पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाटपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यात आधीच पाण्याची मोठी तूट असून, सध्या नगर व नाशिक जिल्ह्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तरीही समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या शिफारशीचा आधार घेऊन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आपल्या सर्वांना सर्वपक्षीय लढा उभारावा लागणार आहे. आपण संघर्ष केल्याशिवाय शासन आपली व्यथा ऐकून घेणार नाही. पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढ्यासाठी सज्ज रहावे, असे युवा नेते विवेक कोल्हे यावेळी म्हणाले.

यंदा दुष्काळामुळे उसाची टंचाई आहे. राजकीय विरोधक गणेश कारखाना चालू नये, यासाठी जाणूनबुजून अडथळे आणत आहेत. गणेशला जिल्हा बँकेने मंजूर केलेले कर्ज रोखले गेले. या कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये व सर्व बाजूंनी कोंडी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आ. बाळासाहेब थोरात व आपण गणेशच्या संचालक मंडळाच्या साथीने सर्व अडचणीतून यशस्वी मार्ग काढत आहोत. गणेश कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत उसाला चांगला भाव देणार असून, सभासदांनी गणेशच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

गणेश कारखान्याला एकेकाळी चांगले वैभव होते. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखाना ऊर्जितावस्थेत आला होता. पण मध्यंतरी कोणाची तरी दृष्ट लागली आणि कारखाना अडचणीत आला. गेली आठ वर्षे गणेश कारखाना ज्यांच्या ताब्यात होता. त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे कारखान्याचे व सभासद शेतकऱ्यांचे वाटोळे झाले. आता हा कारखाना कोल्हे-थोरात युतीकडे आला आहे. आम्ही गणेश कारखाना यशस्वीपणे चालविण्याचे आव्हान स्वीकारले असून, कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून, आर्थिक शिस्त लावून कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू, असा विश्‍वासही कोल्हे यांनी व्यक्त केला. 

आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, गणेश कारखाना अडचणीच्या काळात आमच्याकडे आला आहे. नैसर्गिक संकटांबरोबर राजकीय संकटेसुद्धा आहेत आणि तरीही आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आचारसंहितेच्या काळात बेकायदेशीररीत्या करार करून प्रवरानगरच्या मंडळींनी गणेश कारखाना ताब्यात घेतला. आता त्या कराराची भोकाडी दाखवून गणेश कारखान्याला आर्थिक मदत मिळू नये. यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गणेशनगर परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दहशत पसरवली जात आहे.

गेल्या आठ वर्षांत त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले. त्यांना गणेश कारखाना चालवायचा नव्हता तर बंद पाडायचा होता. त्यांचा हेतूच चांगला नव्हता. प्रवरा कारखान्याने गणेश कारखान्याकडे ८१ कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा आकडा रोजच वाढत असून, यात निश्चितच काळेबेरे आहे. गेल्या आठ वर्षांत गणेशमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. असा आरोप आ. थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला.