शेवगाव तालुक्यातही जरांगे पाटलांच्या राज्यव्यापी आंदोलनाचे पडसाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज भूषण मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाकडे शासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याने त्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. शेवगाव तालुक्यातही आंदोलनाचे पडसाद उमटले असून तालुक्यातील खाम पिंपरी येथील लक्ष्मण बबन दसपुते या युवकाने तीन दिवसापासून गावात बेमुदत उपोषण सुरु केले असून गावातील काही युवक रोज साखळी आंदोलनाच्या माध्यमातून त्यात सहभागी होत आहेत.

शनिवारी या आंदोलनात भक्तराज भारत दसपुते, गणेश अशोक दसपुते, आकाश अशोक डोंगरे आदिंसह युवक सहभागी झाले होते. आता नाही तर कधीच नाही, अशा निर्धाराने परिसरातील युवकांचा त्यास प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज वैद्यकीय अधिकारी डॉ. घुले व त्यांच्या सहाऱ्यांनी उपोषण त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

तहसीलदार प्रशांत सांगडे यांनीही आंदोलनाची दखल घेत तलाठी, ग्रामसेवक यांनी दक्ष राहून रोजच्या रोज आंदोलना बाबतचा  लेखी अहवाल देण्याच्या सुचना दिल्या. तसेच काल पासून भातकुडगाव फाट्यावर सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा दूसरा दिवस असून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणाबाबत शासनाने विना विलंब निर्णय घेण्याची मागणी केली.