शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : साडेतीन शक्ती पिठातील क्षेत्र माहूरच्या श्री रेणुका मातेचे ठाणे असलेल्या आणि प्रति माहुरगड म्हणून लौकिक प्राप्त क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात शनिवारी (दि.२८ ) कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात नामसंकीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला.
आखेगावच्या जोग महाराज सेवा संस्थानचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भक्तीपिठातील तरुण भाविकांनी वारकरी सांप्रदायिक खेळासह नामजप केला. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवस्थानामध्ये या उत्सव सोहळ्यात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे तसेच रात्री भक्तिपिठातील भाविकांचे सांप्रदायिक खेळ आणि त्यानंतर संत महंताच्या समवेत सहभोजन व नंतर चंद्रप्रकाशात आटविलेल्या दुधाचा कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे.
मात्र, यावेळी चंद्र ग्रहणामुळे अन्य कार्यक्रमास फाटा देऊन आई साहेबाच्या सभामंडपात फक्त वारकरी सांप्रदायिक खेळ घेण्यात आले. यावेळी भगवती भक्तानुरागी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हनुमान टाकळीचे महत रमेश अप्पा महाराज, पार्थर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, लक्ष्मण महाराज भालेकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत घुले, प्रा. जनार्दन लांडे, बाळासाहेब चौधरी, डॉ. अरविंद पोटफोडे, तथा भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी राम महाराज यांनी कोजागिरी उत्सवाचे भौगोलिक, सामाजिक व धार्मिक महत्त्व विशद केले ते म्हणाले, धार्मिक, सामाजिक क्षेत्रामध्ये डॉ. भालेराव यांचे योगदान प्रेरणादायी आहे .स्वतःच्या कार्यव्यस्ततेतूनही समाजाचे उत्तरदायित्व ते सातत्याने जोपासतात. आपल्या उपास्य देवतेची मनोभावे सेवा करून मिळालेला सात्विक परमार्थिक आनंद वाटल्याने अधिक द्विगुणीत होतो.
हेच कार्य सेवाव्रती भावनेने नाना भालेराव करत आहेत. जोग महाराज सेवासंस्थांनच्या विधायक कार्यासाठी रेणुका माता देवस्थानचे वेळोवेळी खूप महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. हे ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठीच जोग महाराज सेवा संस्थांनचे सर्व तरुण बांधव प्रत्येक वेळेस देवस्थानच्या उत्सवात उत्फुर्तपणे सहभागी होतात. या महोत्सवासाठी वरूर, सुसरे, देवटाकळी, आखेगाव, कोळसांगवी, वडूले, भातकुडगाव ,येथील भक्तिपिठातील तरुण टाळकरी बहुसंख्येने उपस्थित होते.