कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१ : कोपरगाव शहरातील चौका चौकात आणि सर्व उपनगराच्या गल्ली बोळात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने सर्वसामान्य नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने शहरातील खास करुन निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व रिद्धी-सिद्धी नगर या भागातील जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
जनार्दन कदम आपल्या निवेदनात म्हणाले की, निवारा, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर या भागात या पुर्वी कधी मोकाट जनावरे वावरता आढळत नव्हते. माञ, गेल्या एक वर्षापासून या भागात शेकडो मोकाट डुकरे, गाढव, कुञे व गायांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मोकाट कुञ्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरत असतात. तेच कुञे अनेक माणसांच्या अंगावर चाल करत आहेत. डुकरांचे कळपावर कळप चोहीकडे दिसत आहेत. कुञे डुकरांवर हल्ले करुन त्यांची शिकार करीत आहेत.
स्वच्छ व सुंदर प्रभाग म्हणून कोपरगाव शहरातील हा प्रभाग केवळ मोकाट जनावरांमुळे अस्वच्छ होतोय. मोकाट सोडलेल्या गाढव, गायी, डुकरांचे मालक नागरीकांना ञास देवून या मोकाट जनावरांच्या जीवावर पैसा कमवत आहेत. पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरीकामधुन होत आहे.
नागरीकांच्या समक्ष हा प्रकार होत असल्याने लहान मुलांसह इतरांवर हे कुञे हल्ला करण्याची शक्यता आहे. मोकाट गायींची या भागात कहर केला आहे. रस्त्याच्या मधोमध बसुन रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मोकाट जनावरांची कमतरता म्हणून की काय मोठ्या संख्येने गाढव वावरत आहेत. मोकाट जनावरांमुळे या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले.
शहरातील आरक्षित मोकळ्या जागेमध्ये ठिय्या मांडून बसतात त्यामुळे गल्लीतील घरा पासुन शहरातील चौका-चौकात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी या प्रभागाचे माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी केली आहे.