रोटरी क्लब कडून जिल्हा परीषद शाळेला स्मार्ट डीजिटल बोर्ड भेट
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : प्राथमिक शिक्षण ते अगदी पी. एचडी. पर्यंतच्या शिक्षणाची अध्ययन आणि अध्यापणाची पध्दती काळानुरूप बदलत आहे. कोरोना महामारीत याचा प्रत्यय प्रकर्षाने जाणवला आहे. जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुध्दा आधुनिक पध्दतीने शिक्षण घेता यावे यासाठी रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल कायम प्रयत्नशिल असते.
याच विचारधारेतुन क्लबचे मार्गदर्शक अमित कोल्हे व सुमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन रोटरी क्लबच्या वतीने खडकी, कोपरगाव येथील जिल्हा परीषदेच्या शाळेला इंटरॅक्टिव पॅनल (स्मार्ट डीजिटल बोर्ड) भेट म्हणुन देण्यात आला आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलचे अध्यक्ष रोटरियन राकेश काले यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलच्या वतीने जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला समारंभपुर्वक इंटरॅक्टिव पॅनल भेट म्हणुन देण्यात आला. यावेळी रोटरियन काले बोलत होते. रोटरीयन प्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी स्कूल कमिटीचे मार्गदर्शक ज्ञानदेव रहाणे, रोटरीयन डाॅ. महेंद्र गवळी, रोटरीयन डाॅ. विनोद मालकर, क्लबचे सचिव रोटरीयन विशाल आढाव, रोटरियन इम्राण सय्यद, शाळेच्या मुख्याध्यापिका कांता देवकर व्यासपीठावर उपस्थित होते.
डाॅ. गवळी यांनी यावेळी इंटरॅक्टिव पॅनलची माहिती देताना सांगितले की बहुतांशी शिक्षण संस्थांमध्ये शिकविणे स्मार्ट बनले असुन या डीजिटल बोर्डमुळे फळा आणि खडू ऐवजी डायरेक्ट पेनड्राईव्ह लावुन विद्यार्थ्यांना शिकविणे अधिक सुलभ होवुन वेळेची बचत होईल. डाॅ. मालकर म्हणाले की इंटरॅक्टिव स्मार्ट बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसच्या मदतीने विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षमरित्या शिकवु शकतील. एखाद्या वक्त्याचे मार्गदर्शनही ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळण्यास सुलभ होणार आहे. या बोर्डमुळे विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यास निश्चितच मदत होईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम तांबे यांनी केले.