ये तो सिर्फ शुरवात है, पिक्चर अभी बाकी है – विवेक कोल्हे

श्रीगणेश कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०४ : गणेशनगर परिसराची कामधेनु असलेला गणेश साखर कारखाना अनेक संकटांना तोंड देत आज सुरू झाला आहे. आता ‘गणेश’ ची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात इतर कारखान्यांच्या बरोबरीने गणेश कारखाना उसाला निश्चितच चांगला भाव देईल. येणारा काळ हा खूप आव्हानात्मक आहे. गणेश कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून ‘गणेश’ परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. 

नगर व नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा समन्यायी पाणी वाटप कायदा व कालबाह्य झालेल्या मेंढेंगिरी समितीच्या अहवालाचा आधार घेऊन ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मुळा, प्रवरा, गंगापूर व दारणा धरण समूहातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडले तर गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात व नगर-नाशिक जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. आपल्या भागातील शेती उजाड होणार असून, साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष केला. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन सरकारकडे न्याय मागितला पाहिजे, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

गणेशनगर (ता. राहाता) येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र सराला बेटाचे (गोदा धाम) मठाधिपती ह.भ.प. रामगिरीजी महाराज व श्री उपासनी कन्याकुमारी स्थान (साकुरी) च्या विश्वस्त माधवीताई गुरू गोदावरी यांच्या हस्ते तसेच माजी महसूलमंत्री व गणेश कारखान्याचे मार्गदर्शक आ. बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा गणेश कारखान्याचे मार्गदर्शक, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (३ नोव्हेंबर) झाला. गणेश कारखान्याने सर्व सभासदांची दिवाळी गोड व्हावी, या भूमिकेतून सर्व सभासदांना दहा किलो साखर मोफत देण्याचे जाहीर केले होते त्या प्रमाणे वितरण देखील सुरू झाले आहे.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सचिन गुजर, सुधीर म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, गंगाधरराव चौधरी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, संचालक नारायण कार्ले, बाबा डांगे, अनिल टिळेकर, मधुकर सातव, नाना नळे, आलेश कापसे, संपत चौधरी, शोभा गोंदकर, अरुंधती अरविंद फोपसे, कमल पुंडलिक धनवटे, गंगाधर डांगे, संपत हिंगे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले,

जगन्नाथ बारहाते, रामचंद्र बोठे, भाऊसाहेब थेटे, रामदास बोरबने, विजय फोपसे, जयराज दंडवते, अप्पासाहेब घोगरे, सखाराम चौधरी, संजय सरोदे, चंद्रभान धनवटे, एल. एम. डांगे, श्रीकांत मापारी, राजेंद्र आहेर, चंद्रभान गुंजाळ, दीपक चोळके, धनंजय गाडेकर, नाना शेळके, दिलीप क्षीरसागर, राजेंद्र अग्रवाल, भाऊसाहेब चौधरी, पंकज लोंढे, सुरेश थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक (साखर) शिवाजी दिवटे आदींसह सर्व संचालक मंडळ, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सभासद शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते व संचालकांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सुधीर लहारे यांनी प्रास्ताविक केले.

महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज म्हणाले, जेव्हा आपण परोपकार वृत्तीने कोणतेही कार्य करत असतो तेव्हा परमेश्वराचे सहकार्य मिळत असते. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. जो स्वत:च्या मुखात घास घालायचा प्रयत्न करत असतो त्याची दानवासारखी फजिती होत असते. स्वत:च्या मुखात घास घालणे ही दानवी वृत्ती तर दुसऱ्याच्या मुखात घास घालणे ही दैवी वृत्ती आहे.

कोणतेही कार्य करताना मनात सेवाभाव असू दया. आ. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांना साखर कारखाना चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी गणेश कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली असून, या दोघांच्या कुशल नेतृत्वाखाली गणेश कारखान्याची निश्चितच भरभराट होईल. यावर्षी उसाचे क्षेत्र घटले आहे. निळवंडे धरणाचे पाणी मिळाले तर ‘गणेश’ च्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड वाढेल व कारखाना चांगल्या प्रकारे चालेल. शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल, असा शुभाशीर्वाद त्यांनी दिला.  

युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, मागील कालखंडात २०-२५ वर्षे श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती ब्र. नारायण गिरीजी महाराज यांच्या हस्ते गणेश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत असे; पण गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्यात खंड पडला. तेव्हापासून गणेश कारखान्याच्या सभासदांनी विडा उचलला की, ही खंडित झालेली परंपरा पुन्हा चालू झाली पाहिजे आणि आज महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला. अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे व आर्थिक अडचणी असतानाही आज कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होऊन कारखाना सुरू झाला आहे.

आजचा दिवस हा कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा आनंदाचा दिवस आहे. यंदा दुष्काळामुळे उसाची कमतरता जाणवत आहे. गणेश कारखान्याने यावर्षीच्या हंगामात दोन ते अडीच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण होण्यासाठी ‘गणेश’ च्या सभासदांनी आपला ऊस अन्य कारखान्याला न देता ‘गणेश’ लाच द्यावा. 

सध्या बाजारपेठेत साखरेला प्रतिक्विंटल ३८०० रुपये दर असून, येत्या हंगामात आपल्या कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेला किमान ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी स्वीकारलेली धोरणे सहकार चळवळ व सहकारी साखर कारखान्यांसाठी पूरक अशी आहेत. केंद्र सरकारने इथेनॉलचा दर ५ रुपये वाढवून द्यावा. तसेच साखरेला प्रतिक्विंटल ३८०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

‘गणेश’ च्या निवडणुकीत सभासदांनी प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करून आमच्या बाजूने कौल दिला. निवडणुकीनंतर गणेश कारखान्याची सत्ता कोल्हे-थोरात युतीकडे आल्यानंतर नूतन संचालक मंडळाने पूर्वीच्या संचालक मंडळाने थकवलेली आर्थिक देणी दिली. आम्हाला कारखाना नीट चालवू द्या, असे आम्ही जाहीरपणे आवाहन केले; पण पूर्वीच्या सत्ताधारी मंडळींनी त्यात आडकाठी आणली.

आम्हाला न्यायालयात जावे लागले. ‘भगवान के घर देर है, पर अंधेर नही’ या म्हणीप्रमाणे कालच न्यायालयाने पहिल्या केसचा निकाल आपल्या बाजूने दिला आहे. कुठलाही करार अस्तित्वात नसताना ‘गणेश’ ला जिल्हा बँकेने कर्ज देऊ नये, असे पत्र तुम्ही कसे दिले, अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली आहे. आम्ही पहिली न्यायालयीन लढाई जिंकली असून, ‘ये तो सिर्फ शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत कोल्हे यांनी विरोधकांना इशारा दिला. 

गणेश कारखान्याची रिकव्हरी यापूर्वी ११ टक्क्यांच्या आसपास होती; पण गेल्या सात-आठ वर्षांत कारखान्याची रिकव्हरी ८.७५ ते ९ च्या पुढे गेलीच नाही. गणेश कारखान्यात उत्पादित झालेली साखर नेमकी गेली कुठे? असा मोठा प्रश्न आम्हाला पडला असून, ही साखर इतर कोणत्या कारखान्यात गेली का, अशी शंका लेखा परीक्षकांनी व्यक्त केली आहे.

२००१-०२ मध्ये कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन गाळप केले होते; परंतु मागील हंगामात हा कारखाना १८०० टनानेसुद्धा चालला नाही. सहकारात राजकारण आणू नये, असे अभिप्रेत असताना काही मंडळी राजकारण करून गणेश कारखान्यासमोर अडचणी निर्माण करत आहे. गणेश कारखान्याला जिल्हा बँकेचे कर्ज मंजूर असताना देखील ते दिले गेले नाही. ज्यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला त्यांचे वारसदार असलेल्या नेते मंडळींकडून सहकारी संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. 

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत गणेश कारखाना चालू नये, यासाठी जाणूनबुजून अडथळे आणले जात आहेत. मात्र, आ. बाळासाहेब थोरात व आपण ‘गणेश’ च्या संचालक मंडळाच्या साथीने सर्व अडचणीतून यशस्वी मार्ग काढत आहोत. ‘गणेश’ चा यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यासाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी चिकाटीने काम केले. कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने व संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने मोठी मदत केली. सहकारी साखर कारखानदारी ही तीनचाकी गाडी आहे. एक चाक म्हणजे कारखाना व्यवस्थापन, संचालक मंडळ, कर्मचारी, दुसरे चाक म्हणजे शासनाचे धोरण व तिसरे चाक म्हणजे ऊस उत्पादक सभासद शेतकरी होय, असे कोल्हे म्हणाले. 

आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, गणेश कारखान्याच्या सभासदांना उसाला निश्चितच समाधानकारक भाव दिला जाईल. यंदाच्या गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘गणेश’ च्या कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गणेश कारखान्यालाच देऊन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी कारखान्याला सहकार्य करावे. गणेश कारखान्यावर आलेली सर्व संकटे दूर व्हावी व या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्री गणेशचरणी केली.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जे पाणी वाटपाचे सूत्र ठरले तेव्हा कोणतेही सरकार अस्तित्वात नव्हते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी एकत्र बसून पाणी वाटपाचे सूत्र ठरवले. आज त्याचीच अंमलबजावणी होत आहे. समन्यायी तत्व म्हणून कदाचित ते बरोबर असू शकते; पण सूत्र म्हणून ते चुकीचे आहे. समन्यायी पाणी वाटप कायदा नगर व नाशिक जिल्ह्यासाठी अन्यायकारक असून, आपल्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.