वेळेत पगार, अनुदान व निवडणुका झाल्याने बाजार पेठेत चैतन्य

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : यावर्षी पावसाने दगा दिल्याने दिवाळी सारख्या सणावर दुष्काळाची छाया होती, शेतकरी वर्ग अडचणीत सापडला. मात्र नोकरदार, सेवानिवृत्ती धारक, शासनाच्या विविध निराधार योजनाचे लाभधारक, यांचे पगार व अनुदान याच काळात उपलब्ध झाले. यानिमित्ताने  तालुक्यात कोट्यावधीचे चलन फिरल्याने बाजार पेठेत चैतन्य आले. 

विविध खात्यातील सेवानिवृत्ती धारकाचे पेन्शन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, पंचायत समिती, बँका, महसूल आदि शासकीय कर्मचार्‍याचे पगार या महिन्याच्या पाहिल्या आठवड्यातच झाले. ही रक्कम किमान आठ कोटीवर असेल. तसेच तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, अशा निराधार योजनेच्या २२ हजार ७५० लाभार्थींना देखील तब्बल साडेसहा कोटीचे अनुदान चालू आठवड्यातच आज अखेर पर्यंत प्राप्त झाले असल्याने हा सर्व पैसा चलनात आला आहे. दरम्यान तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील नुकत्याच झाल्या असल्यानेही चलन वाढले आहे. त्यामुळे बाजार पेठेत जान आली आहे. 

पावसाअभावी संपूर्ण तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कपासीचे उत्पन्न घटले आहे. इतर खरीप पिकांनीही दगा दिल्याने शेतकऱ्याने केलेला खर्च ही निघण्याची भ्रांत आहे. तशात किराणा कपडे व इतर साहित्याच्या किंमती दहावीस टक्यानी वाढल्याने सर्वसामान्याचे आर्थिक गणित कोलमडले. त्याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीवर होणे स्वाभाविक असले तरी दिवाळीचा सण हा बहुतेक सर्वच धर्मियांचा आस्थेचा सण आहे.

काहीही करून आपापल्या परीने दिवाळी धुमधडाक्यातच करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे शेवगावसह प्रमुख गावच्या बाजारपेठा सजल्या आहेत. आकाश कंदिल, पणत्या, इलेक्ट्रीकच्या आकर्षक माळा, विविध रंगाच्या रांगोळ्या, रांगोळ्याचे तयार साचे, लक्ष्मी व पुजेचे साहित्य तसेच फटाके, कपडे, किराणा,  खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे.