शेवगाव प्रतिनिधी, दि. २०: तालुक्यातील मुरमी गावच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेतून निवडूण आलेल्या सरपंचाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दाखल केल्यानंतर शेवगाव पोलिसांनी दबंग कारवाई करत अवघ्या १२ तासात दोघा आरोपीना चतुर्भूज करत सरपंचाची सुखरूप सुटका केली. या कारवाई बद्दल पोलिस निरीक्षक विलास पुजारी व त्यांच्या पथकाचे अभिनंदन होत आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुरमी गावचे सरपंच शेषराव वंजारी हे मोटरसायकल वर बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखाना चौकात फळे घेण्यासाठी थांबले असताना अचानक पांढऱ्या रंगाच्या ईरटीका गाडी नंबर एम एच १४ जे इ ८३२७ मधून तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना घेऊन गेले. अशी फिर्याद त्यांच्या पत्नी आशा शेषराव वंजारी राहणार मुरमी यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला दिली.
शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी या संदर्भात तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक तयार करून तपासाला गती दिली. त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बोकील, कॉ. राजेंद्र ससाणे पोना, सुधाकर दराडे यांची नियुक्ती करून त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पाठवून अपहरण कर्ते नितीन जगन्नाथ तहकीक राहणार वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर व नितीन बबन भोसले राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोघांना पकडून त्यांचे ताब्यातील शेषराव वंजारी यांची सुखरूप सुटका केली.
तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली ईरटीका कार देखील जप्त केली. ही कामगिरी गुन्हा दाखल झाल्या पासून अवघ्या बारा तासाचे आत पूर्ण केली. याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक बोकील, कॉ. राजेंद्र ससाणे, पोना नितीन भताने, सुधाकर , ईश्वर गर्जे ,ज्ञानेश्वर सानप यांचे पथकाचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करत आहेत.