शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला असून वाळू तस्कर भयंकर मुजोर झाल्याचे चित्र आहे. दि. २१ नोव्हेंबरला अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तालुका न्याय दंडाधिकारी यांचेवर वाळूचा डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला तसेच काल शुक्रवारी दिनांक २४ नोव्हेंबरला सकाळी तालुक्यातील शिंगोरी येथे गट नंबर २०४ मध्ये १५ ब्रास तर गट नंबर १५४ मध्ये २७ ब्रास असा एकूण ४२ ब्रास अवैध वाळूचा साठा तहसीलदारानी पकडला आहे.
त्यानंतर रात्री तालुक्यातील पिंगेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील २५ ब्रास वाळू चोरीला गेल्याची फिर्याद तेथील मंडळ अधिकारी अय्या अण्णा फुलमाळी यांनी ठेकेदार उदय मुंडे व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांचे विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडे यांनी ग्राम पंचायातीच्या वाळू चोरीची तक्रार पोलीस व महसूल प्रशासनाकडे पुराव्यानिशी केली. मात्र ती दाखल करण्यात येत नसल्याने अखेर सरपंच तानवडे यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतरच खंडपिठाच्या आदेशाने महसूल व पोलिस प्रशासन कामाला लागले.
या संदर्भात मंडल अधिकारी फुलमाळी यांनी दाखल केलेल्या फिर्यादी विषयी अधिक माहिती अशी की, पिंगेवाडीच्या प्राथमिक शाळेच्या व सार्वजनिक कामासाठी ग्रामपंचायतीने शाळेच्या आवारात ठेवलेली वाळू चोरीला गेल्याची तक्रार पोलिस प्रशासन घेत नसल्याने पिंगेवाडीच्या सरपंच तानवडे यांनी ८ सप्टेबर २०२३ ला थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आवश्यक त्या पुराव्यासह दाद मागितली त्यावर खंडपीठाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
त्यानूसार मुंगीचे मंडल अधिकारी फुलमाळी यांना तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी चौकशी करून कार्यवाहीच्या सूचना केल्या. त्यानुसार मंडल अधिकारी फुलमाळी यांनी सरपंचाकडे चौकशी केली असता ५ जून २०२३ रोजी पंचनामा करून चाळीस ब्रास वाळू साठा सरपंचाच्या ताब्यात देण्यात आला होता.
तहसीलदारांनी १६ नोव्हेंबरला या चोरीचा अहवाल मागितला. त्यानुसार फुलमाळी यांनी तो वाळू साठा जेथे होता तेथे पंचनामा केला असता गट क्रमांक ९९ मधील ६ हजाराची १० ब्रास वाळू व जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील ९ हजार रुपये किमतीची १५ ब्रास अशी एकूण २५ ब्रास वाळू चोरीला गेल्याचे आढळले. हा वाळू साठा २३ व २४ ऑगस्ट दरम्यान ठेकेदार उदय भाऊसाहेब मुंडे व अरुण भाऊसाहेब मुंडे यांनी त्यांच्या वाहन क्रमांक एमएच १६ सीडी ३४७०, एमएच १६ सीडी ३६७०, एमएच १६ सीसी २६७० व एमएच १६ सीसी ५५७० तसेच काचेवर मुंडे कॉन्ट्रॅक्टर असे नाव असलेला विना क्रमांकाच्या जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरून नेली असे सांगितल्याचा सरपंचाचा जवाब नोंदवून रितसर फिर्याद दाखल केली असल्याचे नमुद केले आहे.