कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून माजी आ. स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन कार्तिक स्वामी यांचे मनोभावे दर्शन घेतले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळ दूर होऊ दे, शेत-शिवार फुलू दे आणि कष्टकरी शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्व नागरिकांना सुखी, समाधानी, निरोगी आयुष्य लाभू दे, आर्थिक भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी कार्तिक स्वामीजींच्या चरणी केली.
श्रीक्षेत्र पुणतांबा येथे गोदावरी नदीतिरी कार्तिक स्वामी महाराजांचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. कार्तिक स्वामींची सहामुखी मूर्ती असणारे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असून, वर्षभर या मंदिरात भक्तगण पूजा, आरती करत असतात.परंतु हे मंदिर स्त्रियांना दर्शनासाठी वर्षभर बंद असते. फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना दर्शनाचा योग असतो. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र योगावर कार्तिक स्वामी दर्शन विशेष फलदायी आणि पुण्यप्रद असते. पर्व काळात कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आर्थिक व इतर जटील समस्यांचे निराकरण होऊन चांगले आरोग्य, धनसंपत्ती व महिलांना सौभाग्य प्राप्त होते, जीवनात सर्व प्रकारची समृद्धी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते. यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा पर्वकाळ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५४ वाजेपासून सुरू झाला. तो सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ पर्यंत होता. ही मंगलमय पर्वणी साधून माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी पुणतांबा येथील कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेऊन समस्त जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत सिंधु कोल्हे, पुष्पलता कडू, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव आदींसह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, कृतिका नक्षत्राचा पर्व काळ सुरू होण्यापूर्वी रविवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज, पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे,
कार्तिक स्वामी देवस्थानचे विश्वस्त, भक्त मंडळाचे सदस्य, चांगदेव महाराज देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण व साधू-संतांच्या हस्ते कार्तिक स्वामी मंदिरात विधिवत पूजा, आरती व अभिषेक करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. विवेक कोल्हे यांनी कार्तिक स्वामी मूर्तीचे, शिवलिंग, श्रीगणेश व गंगा मातेचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. तसेच प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. स्वामी रामानंदगिरीजी महाराज व अन्य साधू-संतांचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
यावेळी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, सरपंच स्वाती पवार, उपसरपंच निकीता जाधव, सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, भाऊसाहेब जेजुरकर, रमेश भुईर, दादासाहेब सांबारे, कार्तिक स्वामी मंदिर संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय जाधव यांनी विवेक कोल्हे यांचे स्वागत केले.