बोधेगावातील अवैध जुगार व्यवसाय बंद करावा

शेवगाव प्रतिनिधी, दि.१ :  तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठे अड्डे सुरू आहेत. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक-ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.

तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी हाती येतील त्या वस्तू व धान्य विकून तसेच  घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने मोडून किंवा गहाण टाकून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.

ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे परिसरात चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वयात आलेल्या तरुण मुलांची वर्दळ वाढली असून पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हवी म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिली जात आहेत.

अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळली आहे. त्यामुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम होत आहे. सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू असा निर्धार फिरोज पठाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे केला आहे.