समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार – संदीप कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेने ३१ डिसेंबर २०२३ वर्षाखेरीस ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून सहकारी पतसंस्था चळवळीत हा टप्पा एक विक्रम मानला जात असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ची आर्थिक स्थिती आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे संचालक जितू शहा, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ३१ डिसेंबर २०२३ अखेर ९०० कोटी रुपयांच्या ठेवी, ६८७ कोटी रुपये कर्ज वितरण व २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक असून एकूण कर्ज वाटपात ३५३ कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज असल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमध्ये सोनेतारण कर्ज वाटपामध्ये नवा विक्रम समता पतसंस्थेने निर्माण केला आहे. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.७१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे. समता पतसंस्थेने प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा देऊन सहकारी पतसंस्था चळवळीत नावलौकिक मिळविलेला आहे. तसेच संस्थेच्या प्रत्येक वर्षाच्या आर्थिक नफ्यातून कोपरगाव तालुक्याच्या व शहरातील नागरिकांच्या हिताची विविध सामाजिक कामे करत असल्यामुळे समताने सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटविलेला आहे.

विशेषतः शिक्षण क्षेत्रात समता इंटरनॅशनल स्कूल व समता टायनी टॉट्सच्या माध्यमातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव, शिर्डी, राहता, वैजापूर, श्रीरामपूर तालुक्यातील हजारो मुले शिक्षण घेत आहे. कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असणाऱ्या स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अल्प उत्पन्न असलेल्या पालकांचे पाल्य शिक्षण घेत आहे.

त्याच प्रमाणे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिर्डी येथे ‘साई आश्रया’ या अनाथ आश्रयालयात १५० च्या वर निराधार, अनाथ, गरजू मुले-मुली व ७० वयोवृद्ध आनंदाने, गुण्या-गोविंदाने राहत असून गणेश दळवी हे यांची देखभाल करत आहेत. तसेच कोपरगाव शहरातील निराधार, अनाथ, गरजू, अंध व्यक्तींना गेल्या अनेक वर्षापासून घरपोहच मोफत जेवणाचे डबे पुरविले जातात. तसेच कोरोना काळातही दररोज शहरातील ७५० च्या वर व्यक्तींना घरपोहच डबे वाटप केले जात होते.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या सहकार्याने कोपरगाव बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. या सर्व सामाजिक कामात समता पतसंस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आदींचे महत्वपूर्ण योगदान असून कोयटे परिवाराचा ही खारीचा वाटा असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.