कै. उत्तमरावांच्या अंत्यविधीचाही झाला इव्हेंट 

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : तालुक्यातील राजंणी-दहिगावने येथील प्रगतिशिल शेतकरी उत्तमराव काशिनाथ घुले (वय ७९) यांचे शुक्रवारी (दि.५) रात्री ७ चे सुमारास वार्धक्याने निधन झाले. शनिवारी त्यांच्या रांजणी येथील शेती फार्म मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. हा अंत्यविधी एखाद्या ‘इव्हेंट’ सारखा साजरा करण्यात आला.

संपूर्ण मार्गावर सडापाणी मारून दुतर्फा रांगोळी काढून मार्गात ठिकठिकाणी नारळाचे झाप उभारून अत्यविधी मार्ग सुखद, सुसज्ज करण्यात आला होता. अग्रभागी बॅण्ड पथक, त्या नंतर देवी निमगाव देवस्थानचे महंत अशोक महाराज बोरुडे सह अनेक संतमहंतांच्या उपस्थितीत टाळकरी मंडळीचे भजन पथक होते. मागे कै.उत्तमराव यांची पार्थिव चौरंगावर समाधी स्वरूपात बसवून हजारोच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी प्रहार संघटनेचे राम शिदोरे, दहिगावने चे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सतिश राजेभोसले, सामाजिक कार्यकर्ते विलास लोखंडे व महंत बोरुडे महाराज आदिनी श्रध्दांजली वाहताना कै.उत्तमराव यांच्या पारमार्थिक कार्याचा व परिसरावर केलेल्या संस्काराचा उल्लेख करुन एखाद्या जन्म सोहळ्या प्रमाणे तसेच कै.उत्तमराव यांच्या नावाप्रमाणेच अंत्यविधीचा ही ‘उत्तम’ सोहळा साजरा केल्या बद्दल घुले कुटूंबास धन्यवाद दिले.

कै. घुले यांचे मागे अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेचे कामगार संचालक श्रीमंत घुले, प्रा.सुधाकर, व प्रगतिशिल शेतकरी पद्माकर ही तीन मुले, एक विवाहीत मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.