श्रीराम चिंतन सोहळ्यात आमदार काळेंच्या हस्ते महाआरती

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार, शिवभक्त ह.भ.प भाऊ पाटील यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम चिंतन कथा सुरु असून मंगळवार (१६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी या श्रीराम कथेचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे. 

सोमवार (दि.२२) रोजी देशभरातील श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार होत असून श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रांच्या जयघोषात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील वातावरण श्रीराममय झाले असून देशासह राज्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोपरगाव शहरात देखील जय जनार्दन भक्त परिवाराच्या वतीने तहसील कार्यालयालगतच्या मैदानावर शुक्रवार (दि.१२) ते गुरुवार (दि.१८) जानेवारी या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यामुळे कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानाला अयोध्या नगरीचे स्वरूप आले असून श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यामुळे संपूर्ण परिसर श्रीरामाच्या भक्तीसोहळ्यात न्हाऊन निघाला आहे. आ. काळे यांनी देखील या श्रीरामाच्या भक्तीसोहळ्यात सामील होवून या धार्मिक पर्वणीचा लाभ घेतला. प.पु.गुरुवर्य मधुगिरीजी महाराज, प.पु. गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज व प.पु. गुरुवर्य माधवगिरीजी महाराज व ह.भ.प. गणपतजी महाराज लोहाटे यांचे आशिर्वाद घेतले.

यावेळी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे, श्री राम कथेचे आयोजक चांगदेव कातकडे, मिलनकुमार चव्हाण, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, पराग संधान, दिपक कोटमे, मनोज अग्रवाल, राजेश ठोळे, विजय कडू, प्रशांत होन, संदीप कोयटे, हिरालाल महानुभाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व श्री रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.