विविधता हीच भारत देशाची ताकद – बिपीन कोल्ह

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : विविधता, एकता आणि अखंडता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगळे असले तरी सर्व भारतीय बांधव असून, सर्वजण एक आहोत हा संदेश सर्व भारतीय आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला देत असतात. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनी जातीय व धार्मिक सलोखा राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी (२६ जानेवारी) सकाळी ७.५५ वाजता कोपरगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, ८.१० वाजता कोपरगाव तालुका काँग्रेस समिती कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे तर सकाळी ८.२० वाजता कोपरगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बिपीन कोल्हे म्हणाले, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशहिताचा प्रथम विचार केला. आधी देश, नंतर पक्ष आणि इतर सर्व काही ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.

सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद विसरून भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासारखे राष्ट्रीय सण, उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची परंपरा स्व. कोल्हेसाहेबांनी कोपरगाव तालुक्यात सुरू केली. आजतागायत ही परंपरा अखंड चालू आहे. स्व. कोल्हे यांनी आयुष्यभर सर्वधर्मसमभाव जोपासत सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले. कोपरगाव शहरात व तालुक्यात कधीही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सतत काळजी घेतली.

आपल्यासह माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवार स्व. कोल्हे च्या शिकवणीनुसार सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन वाटचाल करत असून, यापुढील काळातही धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू. समाजात अशांतता पसरविणाऱ्या समाजविघातक शक्तींना थारा न देता सर्वांनी माणुसकी जोपासत गुण्यागोविंदाने एकत्र राहिले पाहिजे.

याप्रसंगी स्नेहलता कोल्हे यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना वंदन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा, भारत देशाला आत्मनिर्भर व जगातील महाशक्तिशाली राष्ट्र बनविण्याचा ध्यास घेतला असून, समाजातील शेवटच्या माणसाचे भले कसे होईल, यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र जपत ते समर्पित वृत्तीने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे.

जगातील सर्वात बलवान लोकशाही असलेला भारत देश आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधुता यावर आधारित असलेली सर्वसमावेशक राज्यघटना अर्थात संविधान आपल्या देशाला दिले. या संविधानामुळेच भारताची जगात वेगळी ओळख आहे. स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुभाव व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून आपण एकमेकांशी माणुसकीच्या भावनेतून वागले पाहिजे. कोपरगाव तालुक्यात कोठेही जातीय वा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, शफिक सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास काँग्रेसचे नेते नितीन शिंदे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, बाळासाहेब नरोडे, ज्येष्ठ नागरिक मंचचे विजयराज बंब, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक नसीरभाई सय्यद, भाजपचे माजी शहराध्यक्ष कैलास खैरे, रिपाइंचे नेते दीपक गायकवाड, गोपीनाथ गायकवाड, विवेक सोनवणे, वैभव आढाव,राजेंद्र बागुल, बाबुराव पैलवान,

लक्ष्मण साबळे, जयेश बडवे, सतीश रानोडे, मौलाना अफजल, खलिक , फकीर मोहम्मद पैलवान, इलियास खाटिक, रहीम शेख, इलियास शेख, एस. पी. पठाण, शाहरुख शेख, अबुझर अत्तार, तिलू अत्तार, प्रसाद आढाव, विजय चव्हाणके, सचिन सावंत, नारायण गवळी, संतोष साबळे, जयप्रकाश आव्हाड, राजू सोनवणे, आरिफ, रियाज, पंडित पंडोरे, चंद्रकांत वाघमारे, रोहण दरपेल यांच्यासह भाजप, भाजयुमो, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने होते.