मराठा समाजासाठी २७ जानेवारी ऐतिहासिक दिवस – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले असून, महायुती सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी शनिवारी (२७ जानेवारी) भाजप कार्यकर्ते व सकल मराठा समाजबांधवांसोबत कोपरगाव शहरात ढोल-ताशांच्या गजरात फटाके वाजवून, गुलाल उधळून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक व अतिशय आनंदाचा असून, इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्याची नोंद होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द अखेर त्यांनी पूर्ण केला आहे. आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या प्रगतीचे नवे पर्व सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, मराठा समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असून, आरक्षण मिळावे म्हणून १९८० साली स्व. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाची मागणी केली होती. १९८२ मध्ये मुंबईत मोर्चा काढून ही मागणी लावून धरली; पण आरक्षण न मिळाल्याने त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. गेल्या ४०-४५ वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत होता. यासाठी अनेक आंदोलने झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ५८ मराठा क्रांती मोर्चे शांततेत निघाले. सन २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन कायदा करून मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलेले हे आरक्षण नंतर सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उपोषण करून तीव्र लढा पुकारला होता. त्यांच्या या उपोषणाचे रुपांतर भव्य आंदोलनात झाले. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून सुरू केलेली भव्य पदयात्रा मुंबईत पोहोचण्यापूर्वी अखेर आज सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यात नोंदी सापडलेल्या सर्व मराठा बांधवांच्या परिवारास व त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय घेतला असून, तसा अध्यादेशही सरकारने काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची धार तीव्र केल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. 

मराठा आरक्षणासाठी अनेक समाजबांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व समाजबांधवांचे स्मरण करून कोल्हे म्हणाले, कोल्हे परिवार कायम मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असून, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोपरगावात सकल मराठा समाजबांधवांनी उपोषण केले होते त्यावेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आपण स्वत: या उपोषणास पाठिंबा देऊन, मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती.

त्यासाठी सतत पाठपुरावा केला. अखेर महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सरकारचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो. मनोज जरांगे पाटील यांनी जिद्दीने मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा देऊन आरक्षण मिळवून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने शांततेत आंदोलन करून आरक्षणाची लढाई जिंकली असून, हा समस्त मराठा समाजासाठी सुवर्णक्षण आहे.

प्रारंभी विवेक कोल्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मराठा आरक्षणासाठी कोपरगावात उपोषण करणारे अनिल गायकवाड, अॅड. योगेश खालकर, विनय भगत, बाळासाहेब आढाव, अमित आढाव, विमल पुंडे, प्रतिभा गायकवाड, उमा वहाडणे आदींचा विवेक कोल्हे यांनी सत्कार करून त्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी सभापती सुनील देवकर, भाजपचे शहराध्यक्ष डी आर. काले, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, वैभव आढाव, रवींद्र रोहमारे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, जितेंद्र रणशूर, शिवाजी खांडेकर, गोपीनाथ गायकवाड, दीपक जपे, विजय चव्हाणके, संतोष साबळे, प्रसाद आढाव, पिंटू नरोडे, सतीश रानोडे, दादासाहेब नाईकवाडे, सचिन सावंत, खलिक कुरेशी, हाशम पटेल, शफिक सय्यद, फकिर मोहम्मद पैलवान, संतोष नेरे, बालाजी गोर्डे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, सतीश निकम, साईनाथ नरोडे, विक्रांत सोनवणे, सागर जाधव, सागर राऊत, रवींद्र लचुरे, स्वप्नील मंजुळ, रुपेश सिनगर, स्वराज सूर्यवंशी, संजय तुपसुंदर आदींसह सकल मराठा समाजबांधव, भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.