अध्यात्म परिपाठाच्या संस्कारमूल्यात रामदासीबाबांचे मोठे योगदान-भागवतानंदगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांनी पंचक्रोशीसह संपूर्ण राज्यात संस्कार मूल्याची शिकवण देत अध्यात्माचा परिपाठ असंख्य शिष्यांना देत युवा पिढीला घडवण्याचे काम केले असे प्रतिपादन पंचदशनाम जुना आखाडाचे अजीवन ठाणाधिपती भागवतानंदगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा रविवारी ज्ञानेश्वरी ग्रंथ व ग्रामदैवतासह ह. भ. प. रामदास महाराज वाघ यांच्या हस्ते कलश पूजनाने सुरुवात झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.

ठाणाधिपती भागवतानंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात या भूतलावरील सर्व साधु संत महंत यांच्यासह संपूर्ण देशवासियांचा अलौकिक वाटा असून ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांनाही आयोध्या रामभूमीबद्दल आपार प्रेम होते. त्यांनी त्यांच्या हयातीत विश्व हिंदू परिषदेसह सर्व नामांकित देवस्थानांना, राममंदिर निर्माण कार्यासाठी त्यांच्या परीने आर्थिक सहकार्य केले होते.

गीता, रामरक्षा, मारुती स्तोत्र, हरिपाठ, नामस्मरण, विविध संस्कृत ग्रंथ या माध्यमातून रामदासी बाबा यांनी कोकमठाणच्या तीनखणीतून अध्यात्म ऊर्जा प्रसारणाचे महान कार्य केलेले आहे. त्यांचा संपूर्ण पंचक्रोशीवासीय ३४ वा पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहे ही अलौकिक बाब आहे. अशा संस्कार सोहळ्यातून नामस्मरणाची देवाण-घेवाण वाढून त्यातून संस्काराची बीजे रोवली जातात. चालू वर्षी कीर्तन सप्ताह आयोजित केला आहे. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. 

कच देवयानी अख्यान प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांच्या वनवास काळातील अनंत आठवणी या ठिकाणी आहेत. पवित्र दक्षिणगंगा गोदावरी नदीचा काठ आणि ऐतिहासिक पौराणिक रामायण काळातील संदर्भ असलेल्या कुमकुमस्थानाला (कोकामठान) अनन्य साधारण महत्त्व असून अशा ठिकाणी ब्रह्मलीन संत रामदासीबाबा यांनी तपसाधना केली हे कोकमठाणगावचे परमभाग्य आहे. व्यासपीठ चालक तुकाराम वेलजाळे यांनी संपूर्ण सप्ताहभराची दिनचर्या याप्रसंगी विषद केली.

या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता ४ फेब्रुवारी रोजी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे असेही ते म्हणाले. ह.भ.प. अमोल महाराज गाडे (२९ जानेवारी), गुरूवर्य रामानंदगिरी शास्त्री (३० जानेवारी), ह.भ.प. रामनाथ महाराज पवार (३१ जानेवारी), ह.भ.प. हरिशरणगिरीजी महाराज (१ फेब्रुवारी), डॉ शुभम महाराज कांडेकर (२ फेब्रुवारी), ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक (३ फेब्रुवारी) यांचे रात्रौ सप्ताहभर किर्तन होईल. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यांत येणार आहे. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.