डॉ. हेमंत सुरळे यांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर जग संवाद साधणार

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २४ : कोपरगावचे सुपुत्र डॉ. हेमंत भास्कर सुरळे यांनी कॅनडा येथील वॉटरलू विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह कॉम्प्युटर सायन्स मधुन डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. डॉक्टरेट पदवी संपादीत करताना डॉ.हेमंत सुरळे यांनी जगाला नव्या संवादाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानावर कार्य केले आहे. 

 शिक्षणाची ओढ असल्याने  पीएचडी करीत असताना त्यांचे तीन शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृत व प्रसिध्द झाले. परिणामी त्यांना अमेरिकेतील प्रतिथयश कंपनी स्नॅप फाउंडेशन यांची फेलोशिप सन २०१९ मध्ये प्राप्त झाली. तेथे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स मधील भविष्यातील Augmented Reality ( संवर्धित वास्तविकता) Virtual Reality (आभासी वास्तविकता) आणि Artifitial Inteligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) या विषयांवर सहका-यांबरोबर  वेगवेगळे संशोधन प्रकल्प पार पाडले. 

   त्याअंतर्गत एक नवीन पेटंट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ज्यामुळे स्मार्टचष्मे (Smartglass) वापरून विविध वापरकर्त्यांमध्ये आभासी संवाद(Virtual communication)  सत्र आयोजित केले जाऊ शकते. या प्रणालीमध्ये एका वापरकर्त्याच्या चष्म्यातील कॅमेरा आणि डिस्प्ले वापरून इतर वापरकर्त्यांशी वास्तविक वेळेत संवाद साधता येतो. वापरकर्ते आभासी माध्यम वस्तूंचा वापर करून संवाद साधू शकतात, ज्यामुळे वास्तविक जगातील वातावरणात आभासी वस्तू समाविष्ट करता येतात. या तंत्रज्ञानाने आभासी संवाद अधिक वास्तविक वाटेल. ज्यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुधारेल. यामुळे आभासी संवादात नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे.

हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रात उपयुक्त ठरू शकते, जसे की शिक्षण, व्यवसाय, आणि सामाजिक संवाद. शिक्षण क्षेत्रात, विद्यार्थी आणि शिक्षक यांना आभासी वर्गात अधिक प्रभावीपणे संवाद साधता येईल. व्यवसाय क्षेत्रात, कंपन्या आभासी बैठका आणि सादरीकरणे आयोजित करू शकतात, ज्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल. सामाजिक संवादासाठी, हे तंत्रज्ञान लोकांना त्यांच्या मित्र-परिवारासोबत अधिक जिव्हाळ्याचा अनुभव देऊ शकते.

ही प्रणाली विकसित करणाऱ्या अमेरिकन संशोधकांच्या टीममध्ये वॉटरलू (कॅनडा) येथील डॉ. हेमंत भास्कर सुरळे यांचा समावेश आहे. त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनामुळे हे नवतंत्रज्ञान शक्य झाले आहे. या नवीनतम संशोधनास दिनांक १४ मे २०२४ रोजी अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहे. नजीकच्या भविष्यात अजून तीन  पेटंट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

         सध्याचे हे पेटंट अमेरिकेत प्रकाशित झाले असून लवकरच ते युरोप, कोरिया, आणि चीनमध्ये देखील प्रकाशित होणार आहे. हेमंत  सुरळे यांचे कार्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी  अभिमानास्पद आणि स्फूर्तिदायी आहे.

 डॉ. हेमंत भास्कर सुरळे (पीएच डी, कॉम्प्युटर सायन्स) हे सध्या प्रथितयश अश्या आंतरराष्ट्रीय मेटा META कंपनीत (फेसबुक) संशोधक म्हणून दीड वर्षांपासून कार्यरत आहेत.  डॉ. हेमंत सुरळे हे कोपरगावचे सुपुत्र असून त्यांचे वडील अभियंता भास्कर सुरळे  हे जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता म्हणून सर्वोत्तम कार्य केले. सन २०१८ पर्यंत गोदावरी कालव्यावर कोपरगाव, राहता उपविभागात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव राहता तालुक्यातील सावळी  विहीर खुर्द हे आहे. 

डॉ. हेमंत भास्कर सुरळे यांचे प्राथमिक शिक्षण कोपरगावच्या  एस.जी.विद्यालयात तर  माध्यमिक शिक्षण येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात झाले. सन २०१० मध्ये त्यांनी कोपरगावच्या  संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मधून आयटी इंजिनीअरिंगची पदवी मिळवून  बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानी , गोवा येथे कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रथम क्रमांकाने पोस्ट ग्रॅज्युएशन पुर्ण केले. तद नंतर बंगलोर येथे एक वर्ष नोकरी केली होती.  आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे डॉ. हेमंत सुरळे यांचे सर्व अभिनंदन होत आहे.