तहसिलदारांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसिलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर खालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री १० च्या दरम्यान अमरापुर जवळ घडली. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यातच ही घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात डंपर चालक अन्वर बेग (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि स्कार्पिओ क्र. एमएच १६, सीव्ही २३१३ चा चालक यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तहसिलदार सांगडे यांना अमरापूर गावाजवळ एक डंपर अवधैरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती कळाली. या माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई करण्यासाठी तहसिलदार आपल्या खाजगी गाडीतून अमरापूर येथील बस स्टँड चौकात येवून थांबले. थोड्या वेळात एक विना नंबरचा वाळूने भरलेला ढंम्पर तिसगावच्या दिशेने जाताना दिसून आला. हा डंपर हा गोपनीय माहितीमधील असल्याची खात्री झाल्यानंतर तहसिलदार सांगडे यांनी डंपरचा पाठलाग करत वाहन थांबवण्याचा इशारा केला. यावर संबंधित डंपर चालकाने रस्त्याच्या कडेला डंपर थांबविला.

यावेळी डंपर चालकाला तहसिलदार असल्याचे सांगत त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव अन्वर बेग असे सांगितले. सदरच्या वाहनामध्ये विनापरवाना वाळुची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्री पटल्यानंतर तहसिलदार सांगडे यांनी अमरापुर येथे राहणारे पोलिस हवालदार गरड यांना फोन करुन सदर ठिकाणी बोलावले होते. त्याच दरम्यान त्या ठिकाणी पांढर्‍या रंगाची स्कार्पिओ (क्र. एमएच १६, सीव्ही २३१३) तेथे येवून थांबली. त्यावेळी डंपर चालकाने सांगितले की, डंपर गाडीचे मालक स्कार्पिओ गाडीत आहेत. यावर तहसीलदार सांगडे यांनी स्कार्पिओ चालकाला नाव व पत्ता विचारत असताना तहसिलदारांनी वाहन अडविल्याची खात्री झाल्याने त्याने डंपर चालकाला तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा इशारा करताच डंपर चालकाने तहसिलदार सांगडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर वेगाने डंपर चालवला. मात्र, तहसिलदार यांनी आपल्या गाडीच्या बाजुला उडी मारल्याने ते बचावले.

यावेळी तहसिलदार यांच्या वाहनाला डॅश मारुन ढंम्पर चालक निघून गेला. तर पोलिस हवालदार गरड घटनास्थळावर येत असल्याचे पाहुन स्कार्पिओ गाडीवरील चालक हा स्कार्पिओ गाडी जागेवर सोडून पळून गेला. याबाबत तहसिलदार सांगडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन डंपर चालक अन्वर बेग आणि स्कार्पिओ चालक या दोघाच्या विरोधात भा.द.वि. कलम ३०७, ३५३, ३७९, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७) व ४८ (८), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३, १५, खाण व खनिज अधिनियमन १९५७ चे कलम ४ व २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.