बसस्थानक महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा बंदोबस्त करावा कुणी?

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव शहरात नुकताच लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रकार ऐकून शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींच्या पालक वर्ग तिच्या सुरक्षिततेसाठी विवंचनेत सापडला आहे. महाविद्यालये सुरु झाल्यामुळे बस स्थानकात वाढलेला टवाळखोरांचा बंदोबस्त करावा कुणी? असा सवाल पालकांना पडलेला असुन याबाबत पोलिसांनी खमकी भूमिका घेण्याची सध्या गरज आहे.

       कोपरगाव शहरात विविध महाविद्यालये व हायस्कुल असून या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातुन अनेक मुली शिक्षणासाठी दैनंदिन बसने ये-जा करत असतात. मात्र शाळा महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलींवर सकाळी आणि संध्याकाळी बस स्थानकावर टवाळखोर मुलांच्या टोळ्यांना बघुन मुलींवर भितीने खाली मान घालुन वागण्याची वेळ आली असुन पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या टवाळखोरांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करण्याची पालक वर्गाची अपेक्षा आहे. मागिल आठवड्यात लोकस्वराज्य आंदोलनचे विधीज्ञ नितिन पोळ यांनी याबाबतची पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. मात्र अद्याप त्यावर कुठलीही उपाययोजना झालेली दिसत नाही.

बस स्थानकात सायंकाळी मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीत टवाळखोर मुले ठळकपणे निदर्शनास येतात. मात्र खेदाची बाब अशी की, पोलिस प्रशासनाचे कुणीही यावेळी बसस्थानकात निदर्शनास येत नाही. शाळा महाविद्यालयांच्या वेळेत याठीकाणी दैनंदिन महिला पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे.

     माकड केशभूषा आणि रंगीबेरंगी केसांच्या झिपऱ्यांना झटका देणारे, कानात बाळी, जिन्सच्या न्टी, हातात कंगण, साखळी आणि तोंडात घुटका कोंबुन पिचकाऱ्या मारणाऱ्या मुलांच्या टोळ्या सायंकाळी पाच वाजता बस स्थानकावर निदर्शनास येतात. सायंकाळी महाविद्यालये आणि शाळकरी मुले आणि मुलांनी गजबजलेल्या बस स्थानकात हि टवाळखोर मुले त्यांची मुलींकडे बघुन चाललेली हुल्लडबाजी प्रत्येकाला जाणवत असते. बस स्थानकात गर्दीत मुलींच्या आसपास घोंगावणे, हावभाव करणे असे प्रकार बस स्थानकातून बस निघेपर्यंत या टवाळखोरांचे सुरु असतात.

         बस स्थानक परिसरात काही काळ निरीक्षण करुन अशा टवाळखोरांना बसचे पास किंवा कॉलेज आयडी तपासुन पोलिसांनी चोप देणे सध्यातरी गरजेचे आहे. असाच प्रकार महाविद्यालये आणि शाळा परिसरात दिसुन येतो. अनेक टवाळखोर मुले दुचाकी गाड्या घेऊन शाळा महाविद्यालयाच्या आजूबाजूला फिरतात मुलींना पाहून हॉर्न वाजवणे, उगाच गाड्यांवर जाताना कट मारणे महाविद्यालयात ज्यांचे प्रवेश सुद्धा नाही असे मुले त्या ठिकाणी फिरताना दिसून येतात व ग्रामीण भागातील मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. 

कोपरगाव पोलीस स्टेशनने अशा टवाळखोर टपोरी मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम उघडावी व शाळा महाविद्यालयाच्या आजूबाजूला बस स्थानकावर सकाळी सायंकाळी अशी टवाळखोर मुले विनाकारण फिरताना दिसली तर ताबडतोब गुन्हे दाखल करुन या टवाळखोर प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची सध्यातरी गरज आहे.

महाविद्यालयाचा संपुर्ण परिसर सीसीटिव्हीच्या निगराणीत आहे. टवाळखोर मुलांना आमच्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी चोप देऊन आम्ही त्यांना समज दिलेली आहे. प्रवेश प्रक्रीया पुर्ण झालेनंतर कॉलेज प्रांगणात कुणीही टवाळखोर आढळल्यास गुन्हा दाखल करणार बस स्थानकावरील बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांना पत्र देणार. डॉ.आर.आर. सानप, प्राचार्य ,एस.एस.जी.एम.महाविद्यालय, कोपरगाव