शेवगावात वकील संघाच्या कामकाजावर बहिष्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि.३१ : राहुरी येथील ॲड.राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव या दांम्पत्याची निघृण हत्या झाल्या प्रकरणी शेवगाव न्यायालयातील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून त्याच्या निषेधार्थ तसेच शासनाने ॲडव्होकेटस् प्रोटेक्शन ॲक्ट संमत करावा. अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकिल संघाने केलेल्या मागणीनुसार मंगळवार दि.३० जानेवारीपासून ३ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून शेवगाव न्यायालयातील सर्व वकिल अलिप्त राहणार असल्याचे निवेदन शेवगाव न्यायालयाच्या प्रधान न्यायाधिश संजना जागुष्टे यांना मंगळवारी देण्यात आले.

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही निघृण घटना घडल्या नंतर राहुरी न्यायालयात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकाऱ्यासह अनेक वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने ॲडव्होकेटस् प्रोटेक्शन ॲक्ट संमत करावा या हेतूने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकिल न्यायालयातील कामकाजा पासून मंगळवार दि.३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत सर्व वकिलांनी अलिप्त राहावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार शेवगाव येथील सर्व वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त रहाणार आहेत. कृपया याची नोंद घ्यावी तसेच वकिलाच्या गैरहजेरीमध्ये, प्रकरणांमध्ये पक्षकाराविरुद्ध कोणतेही आदेश पारित होऊ नयेत. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.रामदास बुधवंत, उपाध्यक्ष ॲड. व्ही ए भेरे, सचिव ॲड.संभाजी देशमुख, खजिनदार ॲड.अविनाश शिंदे, माजी अध्यक्ष ॲड.कारभारी गलांडे, ॲड.लक्ष्मण लांडे, ॲड.सुभाष लांडे, ॲड.नामदेव गरड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड अर्जुन जाधव, ॲड. द्वारकानाथ बटूळे, ॲड रघुनाथ राठी, ॲड महेश आमले आदि वकिल उपस्थित होते.