संत आणि परमेश्वर दिव्यत्वाची प्रचिती दाखवितात – रामानंदगिरी शास्त्री

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१ : सुर्य, दिवा, हिरा याचा प्रकाश आपण उघडया डोळयांनी पाहु शकतो. मात्र, ईश्वर आणि संत या भूमंडलातील अदृष्य शक्ती दिव्यत्वाची प्रचिती दाखवित असतात. म्हणुन त्यांचा सहवास, सत्संग प्रत्येकांने घ्यावा असे प्रतिपादन मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा येथील महंत गुरूवर्य रामानंदगिरी शास्त्री यांनी केले. 

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळयानिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन मंगळवारी त्याचे तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. गुरूवर्य रामानंदगिरी शास्त्री पुढे म्हणाले की, कोकमठाण पंचक्रोशीतील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उच्चशिक्षीत होते.

निष्काम कर्मभावनेतुन त्यांनी दक्षिणगंगा गोदावरीतीरी कठोर तपश्चर्या केली. मंगळवारी किर्तन सेवेत रवि, दिप, हिरा दाविती देखणे। अदृष्य दर्शने संताचिया हा तुकाराम महाराजांचा अभंग निवडत त्यावर मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, ब्रम्हदेवानेही संतांचा महिमा समजुन घेतला. कलियुगात नामस्मरण, सेवेला विशेष महत्व आहे. त्याची प्रचिती आपल्यालाही आली, अर्धांगवायूच्या असाध्य आजाराने अंगात बोलण्याचा त्राण राहिला नव्हता. पण नामस्मरणातुन उर्जा मिळाली.

साधु संत महंत यांचे एक वाक्यही जीवन बदलून टाकते. देव अदृष्य आहे तो दिसत नाही पण त्याचे अस्तित्व या भूतलावर कायम आहे. मनुष्याच्या जीवनांत अखेरच्या क्षणी संपत्तीपेक्षा त्याच्या पुण्याईची मोजदाद होत असते. पुण्य करायला फारसा वेळ लागत नाही. कर्म चांगले ठेवा. प्रामाणिकपणांला विशेष महत्व द्या, कितीही कष्ट पडले तरी सकाळ, दुपार, संध्याकाळ भगवंताचे नामस्मरण करा तोच साठा आपल्याबरोबर येत असतो.

संत विश्वाच्या कल्याणासाठी सतत झटत असतात. मनुष्य जन्म चौ-याएँशी लक्ष योनीनंतर मिळाला आहे त्याची आठवण प्रत्येकांने ठेवावी असे ते म्हणाले.