दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ :  नगर तालुक्यातील देहरे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारल्याच्या निषेधार्थ शेवगावात सकल वडार समाज व वडार सक्षम फाऊंडेशनच्या वतीने येथील क्रान्ती चौकात रास्ता रोको करून या दुर्घटनेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. दोषींना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करावी आदि स्व.सपाच्या मागण्या करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी आंदोलका समोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत भावूक होऊन आदेश युक्त भाषणे करून न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी फौंडेशनचे संदीप कुसळकर, संगीता पवार, हरीषजी बंडिवडार, अशोक पवार, रमेश जेठे बापूराव धनवडे, दिलीप सुपारे,
राजूभाऊ धनवडे, गोपाल कुसळकर, यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, मयत साक्षी पिटेकर ही आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी  आपली विधवा आई व लहान भाऊ असे तिघे मिळुन देहेरे येथे रहात होते.

दि.१३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी चारच्या दरम्यान तीला घरा जवळुन प्रिती बाबा जाधव हिने मारहाण करत घेवुन गेली. पुढे १६ जानेवारी ला देहेरे येथील एका विहिरीत तीचा मृतदेह आढळून आला. या मधल्या काळात आरोपींनी तिच्यावर लैंगिक हत्याचार करून तिला मारून टाकून पिकअप गाडी मध्ये घालून घेऊन गेले व विहिरीत फेकून दिले आहे. तीचा निर्दयीपणे खून केलेला आहे. या घटनेमुळे साक्षी पिटेकरचे कुटुंब/नातेवाईक व आसपासचे रहिवासी तसेच वडार समाज खूप दहशतीखाली आहेत.

ही घटना येथील पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणे व कर्तव्यात कसूर करून निष्काळजी पणे हाताळली आहे. ही घटना कर्तव्यदक्ष पणे वेळीच हाताळली गेली असती तर साक्षीचा मृत्यू झाला नसता, अशी आमची भावना आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समाजाच्या मनामध्ये आरोपी नराधमाच्या विरुद्ध व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीसांच्या विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

ही बाब अतिशय गंभीर असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. साक्षीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवून कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी. ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांची भावना साक्षी आहे. पिटेकर व तिच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात केले जाईल.

यावेळी आंदोलना दरम्यान पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या. साक्षी पिटेकर हिच्यावर लैंगिक अत्याचारकरून मारून टाकणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या हत्याकांडातील एक आरोपी प्रीती बाबा जाधव हिला त्वरित अटक करण्यात यावी. साक्षी पिटेकरच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याला सह. आरोपी करण्यात यावे.

प्रीती बाबा जाधव या आरोपीचीची नार्को टेस्ट करण्यात यावी. ऋत्विक संजय जाधव या नराधाम आरोपीची मोबाईल कॉल रेकॉर्डची चौकशी करण्यात यावी. या घटनेतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना या घटनेत सह. आरोपी करण्यात यावे. साक्षीच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याने या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. यावेळी माजी नगरसेवक सागर फडके, बंडू रासने संजय नांगरे, विष्णू घनवट, शिवसेना तालुकाध्यक्ष अशुतोष डहाळे शेवगाव उपस्थित होते.