शेवगाव तहसील कार्यालयातील कारभार तातडीने सुरळीत करावा – गणेश रांधवणे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार तातडीने सुरळीत करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पत्राद्वारे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे केली आहे.

सविस्तर वृत असे कि शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अंत्यत अनागोंदी कारभार सुरु असुन नविन रेशन कार्ड काढणे, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, व सर्वात महत्वाचे रेशनकार्ड ऑनलाइन करणे या कामासाठी नागरिकांची मोठी हेळसांड होत असुन नागरिकांना यासाठी पुरवठा विभागात महिनों महिने चकरा माराव्या लागत आहे. या कामासाठी अनेक महिला तसेच वयोवृद्ध नागरिक दिवसभर पुरवठा कार्यालयाच्या बाहेर बसून असतात. तसेच पिवळे रेशनकार्ड काढण्यासाठी ठराविक रक्कम घेऊनच पिवळे रेशनकार्ड दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ऑनलाइन असणे आवश्यक असल्याने अनेक नागरिक कित्येक दिवस यासाठी या कार्यालयात चकरा मारत आहेत. कार्यालयाला आजपर्यंत किती पिवळे रेशनकार्ड प्राप्त झाले व ते कोणास दिले गेले याची चौकशी झाली तर मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असुन यावर जिल्हापुरवठा विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येते.

मात्र, या विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. या सर्व कामासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. अनेक नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी असताना देखील या कार्यालय प्रमुखाची या विभागातून बदली होत नाही हे विशेष आहे. यासाठी कुठला सरकारी वरदहस्त पुरवठा विभागाला प्राप्त आहे हे समजण्यास मार्ग नाही. असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

या  विभागात आपण तातडीने फेरबदल करुन या विभागाचे कामकाज सुरळीत करावे. हा विषय आपल्या स्तरारील असल्या कारणाने या संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आपण येऊ देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना पत्रानुसार करण्यात आली आहे.