माता रमाई यांचे कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये व कार्यात माता रमाबाई आंबेडकर यांचा खूप मोठा वाटा आहे. माता रमाई यांनी भक्कम पाठबळ दिले म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाच्या प्रगतीत, सामाजिक कार्यात अतुलनीय योगदान देता आले. माता रमाई यांनी समाजासाठी खूप मोठा त्याग केला. त्यांचे कार्य नवीन पिढीसाठी व स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी असून, प्रत्येक स्त्रीने माता रमाई यांचे गुण अंगीकृत करावेत, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती बुधवारी (७ फेब्रुवारी) स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखा जेऊर कुंभारी व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रदेश सचिव दीपकराव गायकवाड होते. 

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, माता रमाई यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर राहिला. त्यांनी घरची परिस्थिती हलाखीची असतानादेखील काबाडकष्ट करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. त्यांनी जिद्दीने व धैर्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका समर्थपणे पार पाडल्या. ज्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तळागाळातील लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लढत होते त्यावेळी माता रमाई यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले.

बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहोचू दिली नाही. डॉ. बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी व सत्याग्रहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. एका त्यागमूर्तीप्रमाणे त्या जीवन जगल्या. माता रमाई यांनी केलेला त्याग, कष्ट, संघर्ष यांचे विस्मरण होऊ न देता तो सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रारंभी स्नेहलता कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, सतीश आव्हाड, माजी संचालक मधुकरराव वक्ते, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते, भास्कर वाकोडे, बाबुराव काकडे, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते, संजय वक्ते, आरपीआयचे राहाता तालुका संघटक रमेश कसबे, सुरेश पगारे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. पंडितराव भारूड यांची कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच शेख यांनी हज यात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष दावीद धीवर, सागर जगताप, कार्याध्यक्ष सुमित पगारे, संघटक निलेश शिंदे, अजय गोरसे, रवी पवार, सचिन गायकवाड, बाबुराव शिंदे, विजय पवार, सुरेश चव्हाण, स्वप्नील भालेराव, अमोल चव्हाण, आदेश माळी, सम्राट बनसोडे, गौतम गायकवाड, अवि पगारे, आकाश पगारे, आदेश भवर, वैभव काकडे, सौरव गायकवाड, अमोल काकडे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधव, महिला, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.