शेवगावात शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : शिवजयंती उत्सव सोहळ्या निमित्त येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मार्फत शेवगावात अतिशय दर्जेदार कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१८ पासून २२ पर्यंत तब्बल चार दिवस अबालवृध्द व तरुणाई साठी बौद्धिका सह संस्कार क्षम कार्यक्रमाचे तसेच डी जे व्यतिरिक्त पारंपारिक सुमधूर वाद्याच्या गजरात अत्यंत शांततेमध्ये या भव्य सोहळ्याचे संयोजन समितीने अत्यंत नेटके व स्तुत्य आयोजन केले आहे.

रविवारी (दि.१८) दुपारी तीनला खंडोबा मैदानावर छत्रपती केसरी जंगी कुस्त्याच्या फडाचे आयोजन आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता संत गाडगेबाबा महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पारंपारिक वाद्य वाजवून शिवप्रतिमेची भव्य शोभा यात्रेचे आयोजन आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता स्वराज मंगल कार्यालय आखेगाव रोड येथे रक्तदान शिबिर तर  सायंकाळी सात वाजता क्रांती चौक शेवगाव येथे बसस्थानकासमोर दारुकामाची भव्य आतिषबाजी आणि शिवरायांच्या महा आरतीचे आयोजन आहे.

मंगळवारी व बुधवारी (दि.२० व २१) दुपारी दोन वाजता छत्रपती चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता प्रथितयश शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचे शिवशंभू पिता पुत्र यांच्या अतीरमणीय भावबंध या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे.

यावेळी शहरातील सर्व प्रमुख राष्ट्रपुरुषांचे चौक सजवण्यात आले असून येथील सर्व मार्गावर दतर्फा भगव्या पताका व झालरीने सर्व शहरच भगवे  करण्यात आले आहे. चौकाचौकात भव्य कमानी, शिवरायांची छवी असलेले झेंडे आदींनी शहर सजले आहे. शेकडो शिव मावळ्यांनी या कामी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.