मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव मध्ये रास्ता रोको

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४ : राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर सगे सोयरे संदर्भात अध्यादेश काढला. मात्र, त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. तसेच २४ फेब्रुवारी पासून राज्यभरात रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील साईबाबा कॉर्नर येथे नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यावेळी शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात बाळासाहेब जाधव, अनिल गायकवाड, विकास आढाव, बाळासाहेब देवकर, विनय भगत,सुनिल साळुंखे, ॲड. योगेश खालकर, साई नरोडे यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. 

दरम्यान आंदोलकांनी महामार्गावर बसुन ठिय्या मांडत भेळ भत्ता खात रस्तावर चक्का जाम केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारी आडीज ते तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होते.

 देवेंद्र फडणवीस यांच्या हेकेखोर स्वभावामुळे  राज्याच व मराठा समाजाचं मोठं नुकसान होत आहे. शासन मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. कायदेशीर मार्गाने आंदोलन करुन मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत असताना शासन जाणुन बुजुन चालढकल करीत असल्याचा आरोप आंदोलन करते बाळासाहेब जाधव यांनी केले.