तालुक्याच्या अधोगतीला लोकप्रतिनिधी जबाबदार – हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील अधोगतीला लोकप्रतिनिधी जबाबदार असून तालुक्यातून विकास हारून गेलाय व गुन्हेगारी, शासकीय कार्यालयात  भ्रष्टाचार प्रकरणे वाढली असून पिण्याच्या पाण्यापासून होणारे हाल असे तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आजी-माजी आमदारांनी फक्त त्यांचे बगलबच्चे मोठे करण्याचे काम केले. सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली नाही. त्यामुळे हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या सर्वसामान्यांच्या बळावर मी विधानसभेचे रणशिंग फुंकत आहे. त्यासाठी तुमची साथ मोलाची असल्याचे प्रतिपादन जि.प. सदस्या हर्षदा काकडे यांनी  येथे केले.

       सोमवारी (दि ११) जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शेवगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विक्रम ढाकणे हे होते . यावेळी  अॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, राजू  पातकळ, रज्जाक शेख, माणिक गर्जे, भागवत भोसले, देविदास गिर्हे, भिवसेन केदार, नवनाथ खेडकर, विष्णू गरड, बबन पवार, मनोज घोंगडे, पृथ्वीसिंह काकडे,   पंडितराव नेमाने आदिची उपस्थितीत होते.
       यावेळी काकडे म्हणाल्या, दहीगावकर व पिंपळगावकर आजी माजी लोकप्रतिनिधी गेल्या ५० वर्षापासून या तालुक्याची सत्ता उपभोगत  आहेत. आतातर ते नात्यागोत्याने एकत्र आले आहेत. निवडणूक आली की त्यांचे जनतेवरचे मतलबी प्रेम जागे होते. इतके दिवस यांना जनतेचे काही देणे घेणे नव्हते.  सर्व पक्षात हे घुसून बसलेले आहेत.

एक भाऊ एका पक्षात तर दुसरा दुसऱ्या पक्षात. दिवसाला पक्ष बदलणारे हे स्वतःच्या स्वार्थासाठी पदे उपभोगतात. यांना फक्त टक्केवारीची पदे लागतात. शेवगाव तालुका यांनी अक्षरशः लुटला आहे. अशी घणाघाती टीका करत राजळे, घुलेचे नांव न घेता त्यांचा समाचार घेत मला जर संधी दिली तर यांच्या ५० वर्षाच्या सत्तेत जेवढी कामे झाली त्याचे दहा पट कामे मी पाच वर्षात पूर्ण करीन असेही नमुद केले ‘

      अॅड. काकडे म्हणाले, तालुक्यातील आजी-माजी प्रस्थापितांनी ताजनापूर प्रकल्पाचे कामामध्ये खोडा घालायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तरी देखील पाठ्पुराव्यामध्ये सातत्य ठेवून ताजनापूर लिफ्टचा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. अशोकराव ढाकणे यांनी प्रास्ताविक तर जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले.